आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Congress, Narendra Modi, Divya Marathi

नरेंद्र मोदींचे मॉडेल उद्योगपतीधाजिर्णे, राहुल गांधी यांची लोणी येथील सभेत टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - शेतकर्‍यांच्या कोट्यवधींची जमिनी चॉकलेटच्या किमतीत घेणारे मोदींचे गुजरात मॉडेल हे विकासाचे मॉडेल नसून उद्योगपतीधाजिर्णे टॉफी मॉडेल असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. शिर्डी मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ लोणी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.


यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राहुल गांधी यांनी वीस मिनिटांच्या भाषणात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. नरेंद्र मोदी यांचे विकासाचे गुजरात मॉडेल हे फसवे व शेतकरीविरोधी आहे.


2004 साली यूपीए सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतानांच शेतकर्‍यांना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. त्यावेळी भाजपच्या खासदारांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. भूसंपादन कायदा भाजपच्या विरोधामुळे दोन वर्षे उशीरा संमत झाला. या कायद्यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनीला अपेक्षेपेक्षा अधिक भाव मिळू लागला. काँग्रेस सरकारला आगामी पाच वर्षे सत्ता दिल्यास 70 टक्के जनतेला मध्यम वर्गात आणण्याचे उद्दिष्ट काँग्रेस पार करणार आहे. लोकांना आरोग्य अधिकाराच्या माध्यमातून संपूर्ण मोफत औषधोपचार, देशातील प्रत्येक गरीबाला पक्के घर देऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करून देण्याचा काँग्रेसचा मानस असल्याचेही राहुल यांनी आवर्जून नमूद केले. यापुढे देशाच्या विविध भागात औद्योगिक क्रांती घडवून आणत मेड इन चायना हे टायटल हद्दपार करून मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र या सारखे टायटल जगभरात नावारूपाला आणण्याचे कॉंग्रेसचे ध्येय आहे. नरेंद्र मोदी यांचा इतिहास कच्चा आहे, काँग्रेस नेत्यांची टिंगलटवाळी करणे याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काही नाही. काँग्रेसने सहविचारांचे राजकारण करून देशाचा विकास केला. प्रवरेच्या भूमीने दिलेल्या सहकाराच्या मॉडेलने राज्याला नव्हे तर देशाला विकासाची दिशा दिल्याचे गौरवौद्गारही त्यांनी यावेळी काढले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र गुजरातपेक्षा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. गुजरात व महाराष्ट्र यांच्यातील विकासाच्या खुल्या चर्चेचे आवाहन मोदींनी स्वीकारले नाही.


जर्मन देशाच्या धर्तीवर भाजप गुजरातच्या माध्यमातून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या देशाच्या घटनेला संरक्षण देण्याची जबाबदारी आता मतदारांवर येऊन पडली आहे. युपीए सरकारच्या काळात देशाच्या विकासाचा दर सर्वाधिक उंचावला आहे. देशाची जनता विकासाच्या मागे उभी राहते. यापूर्वी भाजपच्या इंडिया शायनिंगलाही झुगारले असल्याचे त्यांनी सांगितले.


राहुल अजूनही चॉकलेटमध्ये रमलेले : मोदी
थ्रीडी सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोंदीनी राहुल गांधी यांच्यावर सोमवारी हल्लाबोल केला. राहुल यांचे वय वाढले, तरी बचपना मात्र गेला नाही. त्यामुळे अजूनही ते टॉफीतच रमतात. त्या बालमनातून ते अजून बाहेर आलेच नाहीत, अशी घणाघाती टीका मोदी यांनी केली. औरंगाबादेतील प्रकाशनगर मैदानावर झालेल्या थ्रीडी सभेत लोकांनी मोदींना ऐकण्यासाठी गर्दी केली होती.