आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahuri Assembly Constituency,latest News In Divya Marathi

नात्यागोत्यांच्या राजकारणामुळे पवारांची सभा रद्द, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केला इन्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शिवाजी गाडे हे उमेदवार आहेत. तथापि याच पक्षातील ज्येष्ठ नेते मंत्री जयंत पाटील यांची बहीण उषा तनपुरे या शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात आहेत. त्यामुळे पवार यांची गाडे यांच्या प्रचारार्थ नियोजित सभा नात्यागोत्याच्या राजकारणामुळे रद्द झाली, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
राहुरी मतदारसंघातील राजकीय गणिते वेगाने बदलत आहेत. मागील विधानसभा (2009) निवडणुकीत शिवाजी गाडे, शिवाजी कर्डिले, प्रसाद तनपुरे अशी तिरंगी रंगतदार लढत पाहायला मिळाली होती. त्या वेळी गाडे स्वाभिमानी शेतकरी संघटना, तनपुरे राष्ट्रवादी तर कर्डिले भाजपकडून रिंगणात होते. या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्याने. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी परस्पर विरोधी उमेदवार उभे केले आहेत. परंतु, राष्ट्रवादीने निष्ठावंत तनपुरे यांना डावलून गाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज तनपुरेंनी शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन उषा तनपुरे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या मतदार संघात गाडे, तनपुरे, कर्डिले, काँग्रेसचे अमोल जाधव अशी चौरंगी लढत होईल. उषा तनपुरे या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या भगिनी आहेत. पण त्या आता शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीकडून गाडे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार गुरुवारी (2 ऑक्टोबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौ-यात राहुरी येथे नियोजित प्रचारसभेला उपस्थित राहणार होते. परंतु, पवार यांची राहुरीची सभा ऐनवेळी रद्द होऊन उर्वरित घोडेगाव, नगर, पारनेर येथील सभा पवारांच्या उपस्थितीत झाल्या.
प्रचारसभेमुळे तनपुरेंची अडचण होऊ नये, यासाठीच जाणीवपूर्वक पवारांची सभा रद्द झाल्याची चर्चा राहुरी मतदारसंघात रंगली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गाडेंची कोंडी होत असल्याचे काही कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. या मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांच्या मागणीवरून ही सभा रद्द केल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. असे असताना प्रचारदौरा स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन केला जात नाही का? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मात्र, काही दिवसांत राष्ट्रवादीची जोरदार सभा या मतदारसंघात आयोजित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

चर्चेत तथ्य नाही
राहुरीतील काही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, ही सभा फार लवकर होत असून तयारीला कमी वेळ मिळतोय. पवार साहेबांची सभा असल्याने तयारीसाठी जास्त वेळ हवा होता. हा दौरा प्रदेश पातळीवरून ठरला होता. पण तनपुरेंची अडचण होऊ नये, यासाठी सभा रद्द झाल्याच्या चर्चेत तथ्य नाही. एकदा पक्षाचा उमेदवार ठरल्यानंतर पवार तसे काही पाळत नाहीत. राहुरीत पक्षाची जोरदार सभा घेण्याचे आमचे नियोजन आहे.'' सोमनाथ धूत, सरचिटणीस, राष्ट्रवादी