आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टेबाजांवर पुन्हा छापा; पण सूत्रधारच सापडेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान बुधवारी झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या स्थानिक बुकीला एका ग्राहकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई दुपारी साडेतीनच्या सुमारास गुलमोहोर रस्त्यावरील कस्तुरी निवास येथे करण्यात आली.

घटनास्थळावरून पोलिसांनी तब्बल १२ लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नगर पोलिसांची आजवरची ही सर्वात माेठी कारवाई ठरली. या कारवाईमुळे सट्टेबाजाराचे "मोठे रॅकेट' उजेडात येईल, अशी अपेक्षा पोलिस अधीक्षकांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पण यापूर्वीच्या कारवायांचे जसे झाले, तसेच यावेळीही झाले. काही तासांतच बुकी ग्राहक जामिनावर मुक्त झाले. शिवाय पुण्यातील मुख्य बुकीही पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे सट्टेबाजाराच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे यावेळीही नगर पोलिसांना जमले नाही.
क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी सकाळी पासूनच गुलमोहोर रस्त्यावर सापळा लावला. दुपारी च्या सुमारास एक ग्राहक सट्टा लावण्यासाठी घरात गेल्याची शंका येताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मोहन मथुरादत्त जोशी फोनवरून सट्टा लावत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तत्काळ तेथील मुद्देमाल ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

जोशी याच्या घरातून पोलिसांनी सॅमसंग दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, ११ मोबाइल १२ लाख १० हजार १२० रुपयांची रोकड असा एकूण १२ लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अशोक भाऊसाहेब गर्जे (३१, कायनेटिक चौक, नगर) यालाही ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे, हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, सुनील गायकवाड, दत्तात्रेय हिंगडे, संदीप पवार, जितेंद्र गायकवाड, रावसाहेब हुसळे, उमेश खेडकर, सूरज वाबळे, रोहित मिसाळ, महिला कर्मचारी मनीषा पुरी, प्रियंका चेमटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिस नाईक सूरज वाबळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा इंडियन टेलिग्राफ अॅक्ट कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. जोशी गर्जे यांच्यासह पुण्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील "डेड्डा' ऊर्फ रमेशशेठ यालाही आरोपी करण्यात आले. रमेशला पकडायला गेलेल्या पोलिसांना तो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांना हात हलवत परत यावे लागले, तर आरोपी जोशी गर्जे हे दोघेही गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर वैयक्तिक जामिनावर मुक्त झाले.

गुलमोहोर रस्त्यावरील कस्तुरी निवास येथील छाप्यात जप्त केलेला मुद्देमाल. समवेत पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे सहकारी. छायाचित्र: महेश पटारे.

नगर पोलिसांनी यापूर्वीही दोन-तीन वेळा सट्टेबाजांवर छापे टाकले आहेत. परंतु मुंबई जुगार कायद्यान्वये हा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे काही तासांतच आरोपी जामिनावर मुक्त होतात. शिवाय स्थानिक बुकी दोन-चार ग्राहकांना गजाआड करून पोलिस पाठ थाेपटून घेतात. सट्टेबाजारातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे पोलिसांना अजून जमलेले नाही. यावेळीही अपुऱ्या नाव-पत्त्यामुळे पिंपरीतला सूत्रधार पोलिसांना सापडला नाही. अशा सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्या मुसक्या आवळता आल्या, तरच सट्टेबाजाराचे "मोठे रॅकेट' उजेडात आणता येईल. साहजिकच नगर पोलिसांची "कॉलर' आणखी ताठ होऊ शकेल...

काही तासांतच जामीन
गुरुवारीआरोपी न्यायालयात हजर करून उपनिरीक्षक शिंदे यांनी दिवस पोलिस कोठडी मागितली. पण गुन्हा जामीनपात्र असल्याने आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनीही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. काही वेळातच वैयक्तिक १५ हजार रुपयांच्या जामिनावर आरोपी मुक्त झाले. त्यासाठी दर मंगळवारी पोलिस ठाण्यात हजेरी तपासात सहकार्याची अट आहे. आरोपी जोशीच्या वतीने अॅड. राजेंद्र शेलोत, तर गर्जेच्या वतीने अॅड. संजय दराडे यांनी काम पाहिले.

'प्रतिष्ठित'ही रडारवर?
मोहनजोशी याच्याकडे सट्टा लावणाऱ्यांची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात "कोडवर्ड'मध्ये काही ग्राहकांची नावे लिहिली आहेत. उदा. स्वप्नील, अविनाश, आशिष.... यामध्ये काही "प्रतिष्ठित' एकेरी नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही मंडळी पोलिसांच्या "रडार'वर येणार का, हाही एक प्रश्न आहे. तसे झाले तरच आगामी "आयपीएल स्पर्धे'तील सट्टेबाजारावर परिणाम जाणवू शकतो; अन्यथा यापूर्वी झालेल्या कारवायांप्रमाणे ही कारवाईसुद्धा निव्वळ "स्टंटबाजी' ठरेल.

म्हणून निसटला डेड्डा
'डेड्डा'ऊर्फ रमेशशेठ याच्या शोधार्थ गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक पिंपरीला गेले. मोजक्या पत्त्यावर रात्रभर शोधाशोध केली. पण छापा पडताच मोहन जोशीचे फोन बंद झाले. त्यामुळे संशय आल्यामुळे डेड्डा फरार झाला असावा. शिवाय जाेशीकडेही त्याचा ठोस पत्ता किंवा इतर माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याला पकडायला गेलेल्या पोलिसांना हात हलवत परतावे लागले. डेड्डा हाती लागला, तर सट्टेबाजाराचे मोठे नेटवर्क "ब्रेक' केल्याचे श्रेय नगर पोलिसांना मिळू शकेल. पुढील तपास कितपत सखोल होतो, यावरच ते अवलंबून आहे.

'पोपट फोन'ही जप्त
बुकीकडून११ मोबाइल जप्त करण्यात आले. यापैकी एक "पोपट फोन' म्हणून ओळखला जातो. इतर फोनवर कॉल करून लोक पैसे लावत असतात, तर पोपट फोनच्या "स्पिकर' वर मिनिटामिनिटाला सट्टेबाजारातील भाव जाहीर होत असतो. तो एेकून ग्राहक बोली लावतात. हे मोबाइल पुढील तपासाकरिता महत्त्वाचे ठरणार आहेत. पण त्यासाठी पोलिसांना "सुतावरून स्वर्ग' गाठावा लागेल. बुधवारच्या क्रिकेट सामन्यावर २० ते ४० हजारांची बोली लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून सट्टेबाजाराच्या व्याप्तीचा अंदाज येऊ शकतो.

सट्ट्याचे 'दुबई कनेक्शन'?
सट्टाघेणारा जोशी हा स्थानिक बुकी होता. तो पुण्यातील मुख्य बुकी डेड्डा ऊर्फ रमेश शेठ याच्यासाठी "कलेक्शन' करत असल्याचे चौकशीत समोर आले. जप्त केलेल्या फोनवरील कॉल्सवरून या सट्टेबाजाराचे नगरहून व्हाया पुणे, मुंबई, दिल्ली ते थेट "दुबई कनेक्शन' असल्याची माहिती समोर येत आहे. सट्टेबाजाराची व्याप्ती आंतरराष्ट्रीय असण्याची दाट शक्यता आहे. प्रत्यक्ष येऊन पैसे लावण्याऐवजी सट्टेबाजीचे बहुतांश व्यवहार फोनवरून केले जातात. त्यासाठी विशेष "कोडवर्ड' आहेत. प्रत्येक फोन कॉल रेकॉर्ड होतो. त्यासाठीचे एक विशेष "सॉफ्टवेअर' जप्त लॅपटॉपमध्ये सापडले.

सकाळपासूनच "फिल्डिंग'
नगरमध्येआयपीएल, एकदिवसीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लागतो, ही नवीन बाब नाही. तरुण पिढी सट्ट्यापायी बरबाद होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. यापूर्वी दोन-तीनदा सट्टेबाजांवर छापे पडलेले आहेत. पण पुढील तपासात पोलिसांना काहीच निष्पन्न करता आले नाही. म्हणूनच यावेळी मुद्देमालासह आरोपी पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सकाळपासून "फिल्डिंग' लावली होती. जोशी याच्या घराच्या परिसरात साध्या वेशात पोलिस कर्मचारी पाळत ठेवून होते. मिळालेल्या "टीप'ची शहानिशा होताच त्यांनी वाजता आत 'एंट्री' केली सट्टेबाजार उजेडात आला.
गुलमोहोर रस्त्यावरील कस्तुरी निवास येथील छाप्यात जप्त केलेला मुद्देमाल. समवेत पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे सहकारी. छायाचित्र: महेश पटारे.