आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे उड्डाणपूल होणार खुला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - निंबळक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी गुरूवारी ही माहिती दिली.

बाह्यवळण रस्त्याच्या कामाला भेट देऊन डॉ. संजीवकुमार यांनी पुलाची पाहणी केली. नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. डी. कुलकर्णी, रेल्वेचे अभियंता प्रदीप पाल यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. संजीवकुमार म्हणाले, नगर-दौंड रस्त्यावरील अरणगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून दोन महिन्यांत हे काम सुरू होईल. वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. निंबळक बाह्यवळण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी व फिनिशिंगचे केवळ 10 टक्के काम उरले आहे. या पुलाचे काम 20 कोटींचे आहे. नोव्हेंबरमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर शिर्डीकडून येणारी वाहतूक या बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे.

उड्डाणपुलांचे काम लवकर झाले पाहिजे. नगर शहरातील लोकांना सध्या वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. हा उड्डाणपूल खुला झाल्यास लोकांचा त्रास काही प्रमाणात कमी होईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

कोल्हार पुलाचे काम 2 महिन्यांत सुरू होणार
नगर-मनमाड रस्त्यावरील कोल्हार येथील पुलाचे काम ठेकेदारामुळे रखडले होते. रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. या कामाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती. येत्या दोन महिन्यांत या कामाला सुरुवात होईल.’’ जे. डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, सार्वजनक बांधकाम विभाग.