आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, सेवेच्या रुळांवर असुविधांचा खडखडाट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रवाशांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी-सुविधा देण्याचा रेल्वे मंत्रालय प्रशासन कितीही दावा करत असले, तरी सध्या नगरहून जाणाऱ्या सर्व रेल्वेंमध्ये अनधिकृत खाद्यविक्रेत्यांनी संबंधित अधिकारी रेल्वे पोलिसांच्या आशीर्वादामुळे ‘अधिकृत’पणे कब्जा केला आहे. या विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांची कोणतीही तपासणी होत नाही. इतकेच नव्हे, तर सामान्यांना छळणारे तिकीट तपासणीसही त्यांच्याकडे ‘सोयीस्कर’ दुर्लक्ष करत आहेत.

या सर्व विक्रेत्यांच्या प्रचंड मोठ्या टोळ्या गाड्यांमध्ये घुसून अक्षरश: महागड्या दरात निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री करून प्रवाशांचे आरोग्य वेठीस धरत आहेत. मात्र, त्यांच्यावर अभावानेही कारवाई होत नाही. नगर स्टेशन अशा विक्रेत्यांचा अड्डा बनला आहे. दुपारी कर्नाटक एक्स्प्रेस गेली की, सर्व विक्रेते स्टेशनवरील दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मजवळच्या रेल्वेच्या बागेत जमतात. हे सर्व विक्रेते थेट मनमाडपासून नगरपर्यंत बिनबोभाट कोणत्याही तिकिटाशिवाय किंवा पासशिवाय गाड्यांमध्ये मुक्त संचार करतात. अनेकदा प्रवाशांना सामान घेऊन डबा बदलायचा असेल, तर या विक्रेत्यांचा मोठा अडथळा होतो. त्यांची वागणूकही अतिशय उर्मट त्रासदायक असताना रेल्वे पोलिस तिकीट तपासणीस यांना ‘हात बांधले’ गेल्याने काहीही बोलत नाहीत. मुळात या विक्रेत्यांजवळच्या पाण्याच्या बाटल्याही ‘आयएसआय’ मार्क नसलेल्या अप्रमाणित असतात. त्यांच्याकडील पॅकबंद पदार्थही असेच प्रचलित नसलेल्या ब्रँडचे असतात.

भेळ, समोसे, वडे, इडली-सांबार, पोहे यांसारखेे तयार पदार्थ कोठे कोणत्या परिस्थितीत तयार होतात, याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. असे पदार्थ बेलापूर पढेगाव स्टेशनजवळच्या झोपडपट्टी वसाहतींत गलिच्छ वातावरणात तयार होत असल्याची धक्कादायक माहिती समजली. जेव्हा विक्री नसते, तेव्हा भेळ वडे-समोशांसारखे तयार खाद्यपदार्थ रेल्वेतील स्वच्छतागृहाजवळ ठेवले जातात. प्लॅटफॉर्मवरही अत्यंत घाणेरड्या जागेत हे पदार्थ ठेवले जातात. त्यांवर माशा घोंगावत असतात. हा सर्व प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याची प्रतिक्रिया एका अधिकृत विक्रेत्याने व्यक्त केली. रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मनमानी असहकाराच्या भूमिकेमुळे ते हतबल आहेत.

नगर हे दौंड-मनमाड महामार्गावरील महत्त्वाचे स्टेशन असल्याने दुरांतोसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या वगळता सर्व गाड्यांना थांबा मिळाला आहे. नगर ते मनमाडदरम्यान सर्व रेल्वेंमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी विक्रेते गाड्यांत घुसतात. त्यांच्याकडील पदार्थांची कोणतीच तपासणी होत नसल्याने त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यांच्याकडील निकृष्ट पदार्थांचे दर कमी असल्याने प्रवासी ते खरेदी करतात. रेल्वे पोलिस थेट रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याने या अनधिकृत खाद्यविक्रेत्यांना थेट वातानुकूलित डब्यांतही प्रवेश मिळतो.

नगरमधून दररोज किमान ३२ गाड्यांची ये-जा होते. लष्कराचे महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे येथील स्टेशन कायम गजबजलेले असते. असे असतानाही प्रवाशांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रेल्वेला अनधिकृत खाद्यविक्रेत्यांचा पडलेला विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळत नाहीच, पण उलट त्यांच्या आरोग्यालाच धोका आहे. या विक्रेत्यांची कोठेच नोंद नाही. त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसते. त्यांच्या पदार्थांचा दर्जा कधीही तपासला जात नाही. अधिकृत विक्रेत्यांना मात्र सर्व नियमांची बंधने आहेत. त्यांना खाकी रंगाचा गणवेश घालावा लागतो. त्यांच्याकडील पदार्थांची तपासणी होऊन काही त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर लगेच कारवाईही होते. रेल्वेचे असे अन्यायी धोरण आहे.

विक्रेत्यांना तिकिटाचेही बंधन नाही
एरवी एखाद्या प्रवाशाकडे साधे तिकीट असल्यास त्याच्याकडून टीसी दंड वसूल करतात. मात्र, त्यांच्यासमोरून बिनधास्तपणे वावरणाऱ्या विक्रेत्यांना साधे तिकीटही विचारले जात नाही. कारण त्यांच्याकडून रेल्वे पोलिसांना हप्ते दिले जातात. तो थेट ‘वरपर्यंत’ पोहोचतो. यातून दर महिन्याला संबंधितांना मोठी आर्थिक कमाई होत असल्याचा असा आरोप एका अधिकृत विक्रेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.

भेळीपासून इडलीपर्यंत....
सध्या रेल्वेत अनधिकृत विक्रेत्यांकडून भेळ, चहा, वडापाव, समोसे, मणुका, इडली-चटणी आदी पदार्थांची विक्री होते. यात मिळणारा नफा इतका मोठा आहे, की अनेक विक्रेते स्टेशनपर्यंत आपल्या वातानुकूलित मोटारीतून येत असल्याची माहिती एका प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्याने दिली. या विक्रेत्यांचे थेट रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संबंध असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. फक्त विभागीय व्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेचे संबंधित अधिकारी तात्पुरती बंदी घालतात. वरिष्ठ अधिकारी गेले की, पुन्हा धंदा सुरू होतो.

‘अर्थ’कारणामुळेच सर्व अनर्थ
रेल्वेत अनधिकृत दर्जाहीन, शिळे खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांमुळे स्टेशनवरील अधिकृत विक्रेत्यांचेच फक्त नुकसान होत नाही, तर ज्या रेल्वेंना भोजनगृहाचा डबा (पँट्री कार) असतो, तेथील ठेकेदाराचेही प्रचंड आर्थिक नुकसान होते. शिवाय या अनधिकृत विक्रेत्यांच्या हप्तेखोरीमुळे ते रेल्वेतील अधिकृत विक्रेत्यांवरही दादागिरी करतात. त्यांच्याकडे रेल्वे पोलिस किंवा अधिकारी लक्ष देत नाहीत, असे पँट्रीमधील एका विक्रेत्याने सांगितले.

विभागीय व्यवस्थापकांकडे प्रश्न नेणार
^नगरच्या रेल्वेस्टेशनवरगाड्यांमध्ये अवैधरित्या खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा प्रश्न विभागीय रेल्वे व्यवस्थापकांपर्यंत नेल्यावर या विक्रेत्यांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची लगेच बदली झाली. वेळप्रसंगी या विक्रेत्यांविरोधात कारवाईसाठी जनआंदोलन उभे केले जाईल.'' हरजितसिंग वधवा, सदस्य,विभागीय रेल्वे सल्लागार समिती.