आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Station Area Flyover Bridge Politics Nagar

मंत्री छगन भुजबळ यांचे ठेकेदाराशी ‘मैत्रीपूर्ण’ संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम घेतलेल्या ठेकेदाराशी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे ‘मैत्रीपूर्ण’ संबंध आहेत. त्यामुळेच उड्डाणपुलाचे काम रखडले आहे, असा आरोप आमदार अनिल राठोड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गणेशोत्सव संपताच भुजबळ यांच्या दालनातच उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.

उड्डाणपूल व्हावा, ही नगरकरांची इच्छा आहे. स्टेशन रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात वसाहती व धार्मिक स्थळे आहेत. विद्यार्थी व नागरिकांना याच मार्गावरून शहरात जावे लागते. उड्डाणपुलाचे काम प्रलंबित असल्याने त्यांना अपघातांना तोंड द्यावे लागते. हा पूल होण्यासाठी शिवसेनेने अनेक आंदोलने केली. विधिमंडळाच्या अधिवेशनातही प्रo्न उपस्थित केला. राज्य सरकारने त्याची दखल घेत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली. परंतु ही कारवाई केवळ दिखावाच ठरली. मुळात या दंडात्मक कारवाईच्या विरोधात ठेकेदाराला न्यायालयात दाद मागता येईल, अशी पळवाट जाणीवपूर्वक ठेवण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारचे ठेकेदाराशी चांगले संबंध असल्याचे स्पष्ट होते, असे राठोड म्हणाले.

मंत्री भुजबळ यांच्याकडे उड्डाणपुलाबाबत अनेकदा पाठपुरावा केला. परंतु काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे भुजबळ यांचेही ठेकेदाराशी ‘मैत्रीसंबंध’ असल्याचे स्पष्ट होत आहे. उड्डाणपुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी शिवसेनेने साखळी उपोषण केले होते. भुजबळांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मुंबईत 21 ऑगस्टला झालेल्या बैठकीत ठेकेदाराला दहा दिवसांचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आला. त्याची मुदत उलटून गेली, तरीही कामाबाबत प्रगती शून्य असल्याचे राठोड यांनी सांगितले.

मंत्र्यांनी दिलेली मुदत उलटल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून 30 ऑगस्टला ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत कामाला सुरुवात करावी; अन्यथा निविदेतील कलमानुसार कारवाई करण्याचा इशारा ठेकेदाराला देण्यात आला आहे, असे राठोड यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस महापौर शीला शिंदे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, अर्चना देवळालीकर आदी उपस्थित होते.


आमदार अनिल राठोड यांनी उडवली भाजपची खिल्ली
उड्डाणपुलाची चर्चा संपल्यानंतर पत्रकारांनी राठोड यांचे लक्ष महापालिका निवडणुकीकडे वेधले. भाजपने केलेल्या 50 टक्के जागांच्या मागणीबाबत विचारले असता राठोड यांनी उत्तर देणे टाळले. पण नंतर हसून ते म्हणाले ‘कोणता भाजप?’ उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. नंतर राठोड यांनी सारवासारव करत जिल्हा भाजप की शहर भाजप, असा प्रश्न उपस्थित केला. जागावाटपाबाबत जिल्हा भाजपशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेनेच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले, आमचे उमेदवार निश्चित झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून मनपा निवडणूक लढवल्या. त्यामुळे सेनेकडे उमेदवारांची कमी नाही. प्रभागरचना कशीही असो, जनता सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शहराबाहेरील नेत्यांचे राजकारण मोठे आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक हे त्यांचे ‘स्टेटस्’ नाही, असा टोलाही त्यांनी नाव न घेता काही नेत्यांना लगावला.

भारनियमनाविरोधात आंदोलन
महावितरणने दसर्‍यापर्यंत शहरात भारनियमन करू नये. ज्यांचे वीजबिल थकले आहे, त्यांचे कनेक्शन खुशाल तोडावे, परंतु जे प्रामाणिकपणे बिल भरतात त्यांना भारनियमनचा त्रास कशासाठी, असा प्रश्न राठोड यांनी केला. इतरांच्या सणासाठी महावितरण भारनियमन रद्द करते, मग आमच्याच सणाला नियम आठवतात का? या चुकीच्या धोरणाविरोधात 6 सप्टेंबरला आंदोलन करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.