आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे मुळाचे आवर्तन बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लाभक्षेत्रात २५ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुळा धरणातून सोडण्यात आलेले खरीप आवर्तन बंद करण्यात आले आहे. मंगळवारी (२६ ऑगस्ट) उजव्या कालव्याचा, तर बुधवारी डाव्या कालव्यातून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे.
पावसाअभावी खरिपातील पिके धोक्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार २३ ऑगस्टला मुळा धरणातून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन किमान महिनाभर चालण्याची शक्यता होती. मात्र, २५ ऑगस्टपासून लाभक्षेत्रात यावर्षी पहिल्यांदाच समाधानकारक पावसाला सुरुवात झाली. सलग सात-आठ दिवस पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळण्याबरोबरच लाभक्षेत्रातील पाण्याची गरज तात्पुरत्या स्वरूपात भागली. धरणातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पावसाला सुरुवात झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी उजव्या कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला, तर बुधवारी डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन बंद करण्यात आले. गेल्यावर्षी खरीप पिकांसाठी धरणातून सुमारे ५ हजार दशलक्ष घनफूट (५ टीएमसी) सोडण्यात आले होते. त्या तुलनेत यावर्षी अगदी थोेडे पाणी आतापर्यंत आवर्तनावर खर्च झाले आहे.मुळा धरणात गुरुवारी सकाळी २० हजार ७४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. धरण एकूण क्षमतेच्या ८० टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सध्या धरणात नव्या पाण्याची अावक सव्वादोन हजार क्युसेक्सने होत आहे.
राहुरी तालुक्यात मघा नक्षत्राचा पाऊस चांगला बरसल्याने देवनदीला पूर आला. ओढे-नाले भरभरून वाहत आहेत. वांबोरी येथे सर्वाधिक ७५ मिलिमीटर, तर मुसळवाडी परिसरात ८० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. लाभक्षेत्रातील पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शनिवारपासून (३० ऑगस्ट) पूर्व नक्षत्र सुरू होत आहे. मघा नक्षत्रातील पाऊस पाणलाेटक्षेत्रात चांगला टिकला, तर धरण भरण्याची शक्यता आहे.

मुळा धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. यातील साडेचार हजार दशलक्ष घनफूट मृतसाठा आहे. गेल्यावर्षी मृतसाठ्यातील पाणी वापरण्याची वेळ
येण्याची शक्यता निर्माण झाली होती. लांबलेल्या व कमी पावसामुळे धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा दोन टक्क्यांच्या खाली आला होता. त्यामुळे यावर्षी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. मघा नक्षत्रात चांगल्या बरसलेल्या पावसाने खरिपासाठी होणारी पाणीसाठ्यातील घट अाणखी काही दिवस लांबवली आहे.