आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने उडवली नगरच्या रस्त्यांची दाणादाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सलग तीन दिवस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शहरातील बहुतेक रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. ओढे-नाले व गटारांची वेळेत सफाई न झाल्याने जवळपास सर्वच रस्त्यांवर पाणी साचते आहे. गोविंदपुरा, शाह कॉलनी, यशवंतनगर, पठाण कॉलनी आदी भागातील अनेक घरांमध्ये मैलामिश्रि‍त पाणी घुसल्याने महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे.

मनपा प्रशासनाने यावर्षी पावसाळ्यापूर्वीच्या कामांना उशिरा सुरूवात केली. 7 जूनपूर्वी सर्व ओढे-नाले व गटारांची सफाई होणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी या कामाला सुरूवात केली असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी 15 दिवस लागणार आहेत. ही कामे पूर्ण होण्यापूर्वीच शहरात सलग तीन दिवस पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांची दाणादाण उडाली. ‘दिव्य मराठी’ने 30 मे रोजी प्रसिध्द केलेले ‘पावसाळा तोंडावर; उपाययोजना शून्य’ हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.

गेल्या तीन दिवसांत दिल्ली दरवाजा, अमरधाम रस्ता, लालटाकी, टिळक रस्ता या रस्त्यांसह मुकुंदनगर, बोल्हेगाव व केडगाव उपनगरामध्ये जागोजागी पावसाच्या पाण्याची डबकी साचली आहेत. गटारांची सफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास कोणताही मार्ग नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली. मनपा प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व कर्मचार्‍यांची उदासीनता यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गोविंदपुरा, शाह कॉलनी, यशवंतनगर, पठाण कॉलनी आदी भागात ड्रेनेजलाइन तुंबल्याने पावसाचे मैलामिश्रि‍त पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसले. त्यामुळे मनपाचा आपत्कालिन व्यवस्थापन आराखडा केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले. नालेसफाई करताना उपसलेला गाळ व गवत यांची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नाही. उपसलेला गाळ पावसामुळे पुन्हा नाल्यात पडला आहे.


प्रशासनाचा निषेध
पावसाचे मैलामिश्रि‍त पाणी घरात घुसल्याने गोविंदपुरा, यशवंतनगर, शाह कॉलनी व पठाण कॉलनी परिसरातील नागरिकांनी सोमवारी मनपा कार्यालयावर मोर्चा नेऊन ‘लोकशाही दिना’त प्रशासनाचा निषेध नोंदवला. मनपा अभियंत्यांच्या चुकीमुळेच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले, असा आरोप नगरसेवक संजय गाडे यांनी केला. या भागातील ड्रेनेजचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गाडे यांनी आयुक्तांना दिला.

कानावर हात
पावसामुळे शहरातील रस्त्यांची उडालेली दाणादाण व नागरिकांच्या घरात घुसलेले पाणी याबाबत काय कार्यवाही केली, अशी विचारणा आपत्कालिन व्यवस्थापन प्रमुख आर. जी. सातपुते यांना केली असता त्यांनी सरळ कानावर हात ठेवले. गटारांचे काम सुरू आहे, पण नालेसफाईच्या कामाबाबत मला माहिती नसल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

नियोजनाचा अभाव
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाने काहीच नियोजन केलेले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी यापूर्वीच योग्य नियोजन करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे न झाल्याने मनपाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे, त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे.’’ संग्राम जगताप, माजी महापौर