आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या आठवड्यातच चार महिन्यांच्या पाण्याची बेगमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अवघ्या तीन-साडेतीन हजार रुपयांत केलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे रमाकांत तांबोळी यांना चार महिने पुरेल इतका पाण्याचा साठा करता आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसाचा गच्चीत पडलेला थेंबन् थेंब त्यांनी साठवला आहे.

बारामती, पंढरपूर, मुंबई व पुणे येथील विविध सामाजिक संस्थांमध्ये काम केल्यानंतर निवृत्तीचे आयुष्य तांबोळी नगरमध्ये व्यतित करीत आहेत. सामाजिक कार्याबरोबरच अनेक पर्यावरणपूरक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. बर्डेगल्लीत ते ज्या इमारतीत राहतात, तिच्या गच्चीवर त्यांनी गांडुळखत प्रकल्प तयार केला आहे. त्यामुळे ओल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्याबरोबर झाडांसाठी चांगले खत उपलब्ध झाले आहे.

तांबोळी यांनी या उन्हाळ्यात रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयोग केला आहे. गच्चीवरील पाणी एकत्र करणारा पीव्हीसी पाइप बसवून तो इमारतीच्या खाली असलेल्या हौदाला जोडला. या हौदाजवळच बोअर आहे. 1 जूनला पावसाला प्रारंभ होताच पावसाचे पाणी हौदात साठायला सुरुवात झाली. पहिल्या तीन पावसांतच बोअर चार्ज होऊन त्यातील पाण्याची पातळी वाढली. पावसाचे पाणी किती प्रमाणात हौदात साठते, याची नोंद तांबोळी करतात. त्यांच्या अपेक्षेनुसार पहिल्या आठवड्यात साठवले गेलेले पावसाचे पाणी किमान चार महिने पुरेल. पावसाळ्याची ही सुरुवात आहे. पुढच्या पावसाचे पाणी साठले की वर्षभराच्या पाण्याची बेगमी होईल!

फायदे अनेक, गरज फक्त जनजागृतीची..
"गांडुळ खतप्रकल्प, सोलर सिस्टिम व रेनवॉटर हार्वेस्टिंग असलेल्यांना महापालिका मालमत्ता करात सवलत देते. शिवाय हे प्रकल्प राबवल्यामुळे वीज व इंधनात मोठी बचत होते. विशेषत: गॅस सिलिंडरच्या टंचाईवर मात करता येते. या गोष्टींचा प्रचार करण्यासाठी महापालिका व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन प्रत्येक वॉर्डात बैठका घ्यायला हव्यात. अधिक माहितीसाठी नागरिकांनी माझ्याशी (मोबाइल 9011026497) संपर्क साधावा.’’
- रमाकांत तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते.