आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाला पुन्हा सुरुवात; शेतकरी सुखावला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गणरायांच्या आगमनाबरोबर शहर व जिल्ह्यात पावसाचेही आगमन झाले आहे. तब्बल महिन्याभराच्या विर्शांतीनंतर रविवारी रात्रीपासून शहर व जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवार अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरीच्या 70 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी 497 मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत केवळ 383 मिलिमीटर पाऊस झाला होता. पडलेला पाऊसही सर्वत्र सारखा नव्हता. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. तसेच जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. यावर्षी 1 जूनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. 1 ते 30 जूनपर्यंत 1,899 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या 27.28 टक्के होता. जून-जुलै महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या तब्बल 130 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 846 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभरात 207.4 मिलिमीटर पाऊस झाला. याच कालावधीत गेल्यावर्षी झालेल्या 45 टक्के पावसाच्या तुलनेत यावर्षी सरासरी पाऊस 70 टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.

जून-जुलै महिन्यांतील दमदार पावसानंतर 8 ऑगस्टपासून पावसाने दडी मारली. तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके जळण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले होते. मात्र, रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला. सोमवारी सकाळीही शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू होता. आतापर्यंत अकोले- 555, राहाता-404 , संगमनेर- 268, कोपरगाव- 300, श्रीरामपूर- 299, राहुरी- 281, नेवासे- 259, नगर- 323, शेवगाव- 373, पाथर्डी- 294, पारनेर- 331, कर्जत- 399, श्रीगोंदे- 347 व जामखेडमध्ये 411 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील केडगाव, सावेडी, भिंगार या उपनगरांसह अन्य भागात सकाळी जोरदार पाऊस झाला. भर पावसात भाविक गणरायांच्या आगमनाची तयारी करताना दिसत होते.

दिवसभरात 15 मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. सोमवारी नगर-21, पारनेर-45, श्रीगोंदे-36, कर्जत-17, शेवगाव-10, राहुरी-26, संगमनेर-3, कोपरगाव-6 व राहाता-43 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात सरासरी 15 मिलिमीटर पाऊस झाला. सध्या भंडारदरा 11 हजार 49, मुळा 18 हजार 432, निळवंडे 3 हजार 486, आढळा 746, घोड 7 हजार 649 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.