आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कर्जत व श्रीगोंदे वगळता नगर शहर व जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. गुरुवारी (10 ऑक्टोबर) सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस शुक्रवारी पहाटे चारपर्यंत सुरू होता. या पावसामुळे कांद्यासह अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

नगर, पारनेर, जामखेड, शेवगाव, कर्जत व पाथर्डी या तालुक्यांत गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी 497 मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत केवळ 383 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र 1 जूनपासून जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. यामुळे दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला. गणेशोत्सवात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सायंकाळपासून शहरातील केडगाव, भिंगार व सावेडीसह जिल्ह्यात रात्रभर पाऊस सुरू होता. जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 861 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत 5 हजार 566 मिलिमीटर पाऊस झाला होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला. अकोले 728, संगमनेर 365, कोपरगाव 406, श्रीरामपूर 468, राहुरी 475, नेवासे 479, राहाता 664, नगर 561, शेवगाव 617, पाथर्डी 577, पारनेर 504, कर्जत 664, श्रीगोंदे 728 व जामखेडमध्ये 636 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.कर्जत व श्रीगोंदे वगळता जिल्ह्याच्या सर्वभागात रात्रभर पाऊस झाला. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे कांद्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शहरातही पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

‘मुळा’साठी 3670 घनफूट हवे पाणी
पाणलोट क्षेत्रातील पावसाने मुळा धरणात 500 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी 3 हजार 670 दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे. रब्बी हंगामातील आवर्तनाचे नियोजन होणे बाकी आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठय़ाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.’’ आर. एम. कांबळे, शाखाधिकारी, मुळा धरण, राहुरी.

परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान
दिवाळीच्या कालावधीत कांदा विक्रीसाठी काढण्यात येणार होता. मात्र, परतीच्या पावसामुळे शेतीतील कांदा सडून गेला. अर्धा एकर शेतीत 25 हजार रुपये खर्च करून कांद्याचे पीक घेतले होते. मात्र, पावसामुळे हातातील पीक वाया गेले. पावसामुळे एक लाखाच्या कांद्याचे नुकसान झाले. ’’ मंगल झिने, शेतकरी, पिंपळगाव माळवी.