आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी स्थिती तीनही मंत्र्यांना दिसत नाही का? माजी खासदार दादा पाटील शेळके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अकोले तालुक्यातील काही भाग वगळला, तर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही, पेरण्या नाहीत. शेतकरी मोडकळीस आला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील आघाडी सरकारचे तीनही मंत्री साखरझोपेत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती त्यांना दिसत नाही का? दोन महिन्यांनंतर मते मागायला जनतेच्या दारात कार्यकर्त्यांनी कोणत्या तोंडाने जायचे, असे सवाल करत आघाडी सरकारला माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी घरचा आहेर दिला.

दादा पाटील शेळके यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (2 ऑगस्ट) बाजार समितीतील त्यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्र वादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, जिल्हा बँकेचे संचालक संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, मथुजी आंधळे, भगवान बेरड, ज्ञानदेव दळवी, सूर्यभान पोटे, सुधीर भद्रे, किसनराव लोटके आदी उपस्थित होते.

दादा पाटील म्हणाले, आघाडी शासनातील अंतर्गत गटबाजी ही आघाडी शासनाच्या लयाला कारणीभूत ठरणार आहे. मंत्री, नेते आणि कार्यकर्ते यांच्यामधील दरी वाढत चालली आहे. नेते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. त्यांची कामे होत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा दुष्काळाने होरपळतो आहे. यावर्षीही दोन महिने उलटूनही जिल्ह्यात पाऊस नाही. शेतकरी, पशुधन मोडीत निघण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी छावण्या, चारा डेपो सुरू झाले नाही, तर शेतकरी मोडून पडेल, पण जिल्ह्यातील 3 मंत्र्यांना हे वास्तव दिसत कसे नाही? जनतेच्या गरजेच्या वेळी जर त्यांच्या मदतीला गेला नाही, तर कार्यकर्त्यांनी जनतेला दोन महिन्यांनंतर कोणत्या तोंडाने मते मागायची? नगर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित विचार करून विधानसभेसाठी कोणाच्या पाठी ताकद उभी करायची याचा निर्णय घ्यावा.

मी तुमच्या बरोबर असेन, पण मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर तालुक्याची अस्मिता म्हणूनच मी मागील लोकसभा निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांंच्या पाठीशी उभा राहिलो. तिकीट मिळवण्यापासून प्रचारात त्यांच्यासोबत राहिलो. तालुक्यातील हिंगणगावच्या सभेतच कर्डिले यांनी प्रताप शेळके यांनी विधानसभेची उमेदवारी करावी, मी पाठीशी राहील, असा शब्द दिला होता, पण ऐन मतदानाच्या दोन दिवस अगोदर शेळकेंना मतदान करू नका, असा आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. मग तालुक्याची अस्मिता फक्त आम्हीच पाळायची का, असे म्हणत कोणाचे चांगले करता नाही आले, तर वाईट तरी करू नका, असा टोला पाटील यांनी लगावला.

मंत्री माझा फोनच घेत नाहीत, तर सर्वसामान्यांचे काय?
नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील विद्यापीठ उपकेंद्रासाठी ग्रामस्थांनी जमीन दिली. पुढील कार्यवाहीसाठी आम्ही जिल्ह्यातील तीन मंत्र्यांसह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही होकार दिला, पण सहा महिन्यांपासून त्या प्रकरणांना मंजुरी मिळालेली नाही. जिल्ह्यातील मंत्री तर माझा फोन पण घेत नाहीत. आम्ही काय आमच्या घरची कामे सांगत आहोत काय? माझ्यासारख्या माजी खासदाराची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अवस्था काय असेल, असा सवालही शेळके यांनी केला.