आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येरे घना...खरिपासाठी आता हवा कृत्रिम पावसाचा पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. आठवडाभरात पाऊस आला नाही, तर शेतकरी उद्ध्वस्त होईल. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यभरात कृत्रिम पाऊस पाडावा, या मागणीने आता जोर धरला आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी, तसेच मंत्रालय स्तरावर पाठवण्यात आले आहेत.

जिल्ह्यात 2011 व 2012 या वर्षात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. 2013 मध्ये समाधानकारक नसला, तरी दुष्काळ हटवण्याइतका पाऊस झाला. दुष्काळात होरपळलेला शेतकरी सावरत असतानाच उन्हाळ्याच्या शेवटी गारपीट आणि वादळी पावसामुळे पुन्हा अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागले. या वर्षी जून उलटला, तरी पावसाने हजेरी लावली नाही. शेत मशागती करून तयार आहेत. पण पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. पेरणीचा हंगाम उलटून गेल्यानंतर पाऊस पडल्यास उत्पन्नात कमालीची घट होते. त्यामुळे आता कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे

लोकरंग फाउंडेशनच्या संचालिका माधुरी चोभे यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन देऊन कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी केली आहे. पाणी टंचाईचे संकट लक्षात घेऊन यंदा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा. कृत्रिम पाऊस पाडल्यास शेतक-यांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांच्या क्षेत्रात अद्याप पाऊस न झाल्याने मुंबई महापालिकेने तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच प्रयोग नगर जिल्ह्यातही करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

- काय आहे कृत्रिम पाऊस ?
ढगातील बाष्पाची क्षमता, तापमान व वा-याची दिशा, वेग हे घटक कृत्रिम पावसासाठी महत्त्वाचे असतात. यापैकी एका घटकाचाही असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशा वेळी ढगांमधील बाष्पाचे प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केले की, त्याचे पाण्याच्या थेंबांत रूपांतर होते. काळ्या ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडणे म्हणजे कृत्रिम पाऊस.
मंत्रालयाकडून दखल
- कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्याची दखल घेत कृत्रिम पावसाच्या मागणीसंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी कृषी आणि पर्यावरण विभागाच्या सचिवांना कळवल्याचे मंत्रालयाने ई-मेलमध्ये म्हटले आहे.’’ माधुरी चोभे, संचालिका, लोकरंग.
आवश्यक उपाययोजना करा.
- अलीकडच्या काही वर्षांत संपूर्ण जून महिना पावसाअभावी कोरडा जाण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आहे. अशा परिस्थितीत आवश्यक उपाययोजना म्हणून कृत्रिम पाऊस पाडायला हवा.’’ राम शिंदे, आमदार, भाजप.