आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधानकारक पावसाची जिल्ह्याची प्रतीक्षा संपेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जुलैचा पहिला पंधरवडा संपला, तरी जिल्हावासियांची समाधानकारक पावसाची प्रतीक्षा संपायला तयार नाही. अकोले तालुक्यातील डोंगराळ भाग वगळता जिल्ह्यात सर्वदूर किरकोळ पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबण्याबरोबरच पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या थोड्याफार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणात शुक्रवारी (18 जुलै) नवीन पाण्याची आवक सुरू होणार आहे. मात्र, ही आवकही किरकोळ स्वरुपाची असेल, अशी शक्यता आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, दुसरा आठवडा उलटला, तरीही पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी अवघ्या सहा टक्के क्षेत्रात पेरण्या होऊ शकल्या. बियाणे व खतांसाठी गुंतवणूक करून बसलेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. मोठा पाऊस येईल, असे वातावरण तयार होत आहे. मात्र, प्रत्यक्षात किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने भ्रमनिरस झाला आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ बारा टक्के पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाचे प्रमाणही असमान आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या मुळा धरणात यावर्षी अद्याप नव्याने पाणी आलेले नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. सोमवारी (14 जुलै) अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरात झालेल्या पावसाने नदीपात्र प्रवाही झाले. धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर हे पाणी आले असून 2247 क्युसेस वेगाने ते धरणाकडे सरकत आहे. शुक्रवारी पहाटेपर्यंत नवे पाणी धरणात पोहचेल, अशी माहिती कनिष्ठ अभियंता आर. एम. कांबळे यांनी दिली.

गेल्यावर्षी 19 जुलैला नवीन पाण्याची आवक सुरू झाली होती. सध्या मुळा धरणात एकूण क्षमतेच्या 19 टक्के पाणीसाठा आहे. साडेचार हजार दशलक्ष घनफुट मृतसाठा वगळता 442 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून पाणीपातळी 1754 फुटांपर्यंत खाली आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत पाणीपातळी 1775 फुटांवर होती, तर एकूण पाणीसाठा 10 हजार दशलक्ष घनफुटांवर पोहोचला होता. त्या तुलनेत यावर्षीच्या परिस्थितीने सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. अंदाज वर्तवणार्‍या खासगी संस्थांनी सर्वदूर दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. किमान हे अंदाज तरी खरे ठरावेत व वरुणराजा भरभरून बरसावा, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.
आवर्तनावरची उधळपट्टी भोवली
अल-निनोमुळे मान्सूनचा पाऊस कमी बरसणार, असा अंदाज वेधशाळांनी पूर्वीच वर्तवला होता. मात्र, या अंदाजांकडे कानाडोळा करत, तसेच जायकवाडीला पाणी देण्याची वेळ येऊ नये, यासाठी उन्हाळी आवर्तनात पाण्याची उधळपट्टी करण्यात आली. उन्हाळी आवर्तनासाठी साडेसात टीएमसी (7405 दशलक्ष घनफूट) पाणी लाभक्षेत्रात सोडण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकारण करताना पाणीटंचाईच्या भीषणतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.
पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण यावर्षी अत्यल्प आहे. जूनच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात दरवर्षी धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होते. मात्र, यावर्षी पाण्याची आवक सुरू होण्यास जुलैचा तिसरा आठवडा उगवला. लाभक्षेत्रातही समाधानकारक पाऊस नाही. हीच परिस्थिती राहिली, तर रब्बी व उन्हाळी आवर्तन धोक्यात येणार आहे. डोंगरमाथ्यांवर सुरू असलेल्या पावसाने दिलासा दिला असला, तरी दमदार पावसाची गरज आहे.
नगर शहरात कमी दाबाने पाणी; कपातीचा निर्णय नाही
मुळा धरणातील पाणीपातळी 1752 फुटांपेक्षा कमी झाल्यास महापालिकेला पूर्ण दाबाने पाणी उपसा करणे कठीण होणार आहे. सध्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पाणी उपशावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मागील पंधरा दिवसांपासून नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शहराच्या पाणी कपातीबाबत अद्याप निर्णय झाला नसला, तरी महापालिका खंडित वीज पुरवठ्याचे कारण पुढे करत अघोषित पाणी कपात करत आहे. त्यामुळे नगरकरांसमोर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.