आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Water Harvesting For Water Management In Nager

पाणी व्यवस्थापनासाठी "रेन वॉटर हार्वेस्टिंग' मंत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी "रेन वॉटर हार्वेस्टिंग' (पर्जन्य जलसंचय) हा उत्तम पर्याय आहे. नगर शहरातील नागरिकांनी हा पर्याय स्वीकारावा, यासाठी पर्यावरणप्रेमी संस्था हरियाली जनजागृती अभियान राबवणार आहे. शहरात आतापर्यंत ८० पेक्षा जास्त इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. हे प्रमाण वाढले, तर पावसाळ्यात शहरातून वाहून जाणा-या लाखो लिटर पाण्याचे योग्य व्यवस्थापन होऊ शकेल. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मंत्र देण्याचा प्रयत्न हरियाली करणार आहे.

पाऊस हाच पाण्याचा मूलभूत स्रोत आहे. त्यासाठी पावसाचे पाणी अडवून त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. वेळेत पाऊस पडला नाही, तर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी हरियाली संस्थेने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय सुचवला आहे. शहरातील जास्तीत जास्त इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग होण्यासाठी हरियाली जनजागृती अभियान राबणार आहे. या अभियानात नागरिकांसह महापालिका बांधकाम व्यावसायिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात कायमस्वरूपी टक्के सूट देण्याची मागणी हरियालीने मनपाकडे केली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने मुबंई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १४० ‘ब’ नुसार शहरातील इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. त्यासाठी नागरिकांना विविध करांतून काही प्रमाणात सूट देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. सूट किती कोणत्या प्रमाणात द्यायची, याबाबतचा निर्णय संबंधित महापालिकांनी घ्यायचा आहे. त्यानुसार नगर महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा बायोगॅस यापैकी दोन उपक्रम राबवणाऱ्या नागरिकांना संकलित करात टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील ३०० चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या हॉस्पिटल्स, शाळा-महाविद्यालये, अपार्टमेंट, कॉम्प्लेक्स, तसेच विविध कार्यालयांच्या इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. शहरात अशा ८० पेक्षा अधिक इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. ही संख्या वाढवण्यासाठी हरियालीने जनजागृती अभियान हाती घेतले आहे. इच्छुकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणे, प्रात्यक्षिक दाखवणे, जलमित्र पुरस्काराने गौरव करणे असे अनेक उपक्रम अभियानांतर्गत राबवले जाणार आहेत. त्यामुळे शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगला चालना मिळणार आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन पाणी व्यवस्थापनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन हरियाली संस्थेतर्फे करण्यात आले आहे. मनपानेदेखील रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी सांगितले.

प्रभागनिहाय रेन वॉटर हार्वेस्टिंग
०३ - झेंडीगेट
५१ - बुरूडगाव
०५ - शहर
२४ - सावेडी

मनपाकडे पाठपुरावा करणार
मोठ्या इमारतींप्रमाणेच लहान इमारतींसाठी देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शहरातील इमारतींचा सर्व्हे करून हा उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात कायमस्वरूपी टक्के सवलत द्यावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.'' सुरेश खामकर, अध्यक्ष, हरियाली संस्था.

हरियालीचे अभियान
रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी बांधकाम व्यावसायिकांकडे आग्रह धरण्यात येईल.
रेन वॉटर हार्वेस्टिंग करणा-यांना मालमत्ता करात कायमस्वरूपी टक्के सूट द्यावी
नव्याने उभारण्यात येणा-या इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे
रेन वॉटर हार्वेस्टिंगची माहिती देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन इच्छुकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांचा जलमित्र पुरस्काराने गौरव लवकरच करण्यात येणार.

असा आहे फायदा
नगरशहरात पावसाचे सरासरी प्रमाण ७०० मिलिमीटर आहे. संपूर्ण पावसाळ्यात एक हजार चौरस मीटरच्या इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे साठवले, तर १० हजार लिटरचे ५६ टँकर पाणी उपलब्ध होते. हे पाणी बोअरवेलमध्ये सोडले, तर भूजलपातळी वाढण्यास मदत होते. हा उपक्रम राबवण्यासाठी एका इमारतीसाठी जास्तीत जास्त १० ते १५ हजार रुपये खर्च येत असला, तरी तो मनपाकडून मिळणा-या कर सवलतीमधून वसूल होतो.