आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Water Harvesting Imlementing In Seven Talukas In District

जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार भूजलाचे पुनर्भरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - खालावलेली भूजल पातळी वाढवण्यासाठी कृत्रिम पद्धतीने जिल्ह्यातील सात तालुक्यांतील 140 गावांत पावसाचे पाणी विशिष्ट पद्धतीने मुरवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असून आतापर्यंत 60 गावांतील ओढय़ांत व जलस्रोतांजवळ चर खोदण्यात आले आहेत.

नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी खासगी विंधन विहिरी घेऊन जमिनीची अक्षरश: चाळणी केली आहे. बेसुमार पाणीउपसा व अत्यल्प पावसामुळे भूजल पातळीत कमालीची घट आली आहे. मागील वर्षी जून 2012 मध्ये 198 तालुक्यांत 60 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला होता. मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाच तालुक्यांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खालावल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षीदेखील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होते. त्यामुळे पाणीपातळी कमालीची खालावली आहे.

यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांत उद्भव बळकटीकरण व पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवून भूजलाचे पुनर्भरण करण्याचा निर्णय जुलै 2012 मध्ये घेतला. 2011 व 2012 या वर्षात टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांचा या योजनेत समावेश आहे. प्रत्येक गावात किमान पाच रिचार्ज शाफ्ट (विंधन विहीर), दोन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीभोवती रिचार्ज ट्रेंच (चर) घेण्यात येणार आहेत. नगर, पारनेर, कर्जत, संगमनेर, जामखेड, नेवासे, र्शीगोंदे या तालुक्यांत हे काम सुरू आहे. या कामासाठी जिल्ह्याला शासनाकडून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. हा निधी भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाने संबंधित ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे वर्ग केला आहे.

पुनर्भरणाच्या उपाययोजनांसाठी प्रतिगाव दोन लाख 19 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार या रकमेत बदल करता येणार आहे.

13 जिल्ह्यांत काम सुरू

ही मोहीम राज्यातील नगरसह, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांतील 46 तालुके व त्यातील 479 गावे व वाड्यांवर राबवला जात आहे.

60 गावांत योजना पूर्ण

प्रशासनाकडून आलेला तीन कोटींचा निधी ग्रामपंचायत स्तरावर वर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 60 हून अधिक गावांत पुनर्भरणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित गावांतील योजना एका महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे भूजल सव्र्हेक्षण विभागाच्या कार्यालयातून सांगण्यात आले.


तीन प्रकारांत पुनर्भरण
रिचार्ज शाफ्ट : प्रत्येक गावात पेयजल स्त्रोतांच्या सभोवार 20 ते 25 मीटर खोलीचे 4 ते 5 बोअर होल्स (विंधन विहिरीप्रमाणे) घेण्यात येईल. सभोवती 2 मीटर व्यासाच्या गोलाकार चरात दगड, वाळू, विटांचे तुकडे टाकून वाहून जाणारे पाणी मुरवण्यात येईल.
ट्रेंच कम रिचार्ज शाफ्ट : पेयजल स्रोत ज्या नाल्यावर आहे, त्या नाल्याच्या पात्रात उद्भव विहिरीच्या वरील बाजूस नाल्याच्या रुंदीएवढा दोन मीटर खोल व 10 ते 12 मीटर लांब चर खोदण्यात येईल. याच्या मध्यभागी बोअरहोल (रिचार्ज शाफ्ट) खोदण्यात येईल. त्याभोवती दोन मीटरच्या गोलाकार भागात विटांचे तुकडे व इतर साहित्यापासून फिल्टर मीडिया तयार करून नाल्याचे पाणी जमिनीत मुरवण्यात येईल.
विहिरीभोवती गोलाकार चर : पिण्याच्या पाण्याच्या व नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीभोवती दोन मीटर खोल व रुंद गोलाकार चर खोदून फिल्टरमधून पाणी मुरवण्यात येणार आहे.


पुढील वर्षी होणार लाभ
भूजल पुनर्भरणाचा कार्यक्रम राबवताना स्थानिक पातळीवर साधनसामग्री मिळण्यास अडचणी येतात. टंचाईच्या पार्श्वभूमीवर किरकोळ अपवाद वगळता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 60 गावांमधील पुनर्भरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित गावे मार्चअखेर होणार आहे. पुढीलवर्षी पाऊस झाल्यास या गावांना त्याचा लाभ होणार आहे.’’ आर. एस. गोसकी, भूवैज्ञानिक.