आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा: जिल्ह्यात सर्वत्र पेरण्यांना वेग, टंचाई कमी होण्यास होणार मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुळा व भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नगर शहरात दुपारी पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान 497 मिलिमीटर आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. त्यात एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. जून, जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. त्यामुळे खरीप हंगाम संकटात आला. जुलैच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात 8 जुलै अखेरपर्यंत अवघ्या 3 टक्के पेरण्या झाल्या होत्या. 23 जुलै अखेर 14 टक्के व 30 जुलैअखेर 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 60 टक्के पेरण्या झाल्या होत्या. शेतक-यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. आता पेरण्यांना वेग येईल. मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 91 मिलिमीटर पाऊस अकोले तालुक्यात झाला. संगमनेर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदे या तालुक्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर शहरातही रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती. बुधवारी दुपारी पावसाने विश्रांती घेतली. पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. खड्डे अधिक रूंदावले आहेत. अकोले तालुक्यात संततधार पावसामुळे भातपिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदूर मध्यमेश्वर (जि. नाशिक) धरणातून बुधवारी सकाळी 18 हजार क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मुळा धरणात बुधवारी दुपारी 50 हजार 820 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू होती. गेल्या 12 तासांत मुळा धरणात एक टीएमसीहून अधिक पाण्याची आवक झाली. 26 टीएससीच्या या धरणात सध्या 10 टीएमसी साठा झाला आहे.

24 तासांत 155 मिलिमीटर पाऊस
24 तासांत जिल्ह्यात 155.9 मिलिमीटर पाऊस झाला. अकोले 91, संगमनेर 8, कोपरगाव 6, श्रीरामपूर 3, राहुरी 9.6, नेवासे 3, राहाता 4, नगर 4, शेवगाव 1, पाथर्डी 1, पारनेर 12, कर्जत 2, श्रीगोंदे 9 व जामखेडमध्ये 2.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस शेवगाव व पाथर्डी तालुक्यात झाला आहे.

6.22 लाख नागरिकांना टँकरचे पाणी
पावसाला चांगली सुरुवात झाली असली, तरी टँकरची मागणी मात्र कमी झालेली नाही. जिल्ह्यात सध्या 338 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 287 गावे व 1,318 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तब्बल 6 लाख 22 हजार 356 नागरिकांना टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डी (73) व पारनेर (57) तालुक्यात सुरू आहेत.