आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; खरिपाला जीवदान, रब्बीची पायाभरणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे तालुक्यातील खडका फाटा येथील ओढा असा ओसंडून वाहत होता. - Divya Marathi
नेवासे तालुक्यातील खडका फाटा येथील ओढा असा ओसंडून वाहत होता.
नगर- सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारलेला पाऊस महाराष्ट्रात परतला असून दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला. विशेषत: नगर तसेच मराठवाड्यात रविवारी चालू हंगामातील चांगला पाऊस झाल्याने अनेक भागांत पिकांना आधार झाला आहे. 

नगर शहर तसेच जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात रविवारी चांगला पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे ढोरजळगावशे येथे घराची भिंत कोसळून गोपाळ लक्ष्मण देशमुख (६५) या वृध्दाचा मृत्यू झाला. पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओढे अोसंडून वाहत जामखेड तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परतलेला हा पाऊस राज्यातील अनेक खरीप पिकांना जीवदान आणि रब्बी पेरणीची पायाभरणी ठरणार आहे. 

पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख खरीप पिके हातातून जाण्याची भीती होती. मात्र, दोन दिवसांतील पावसाने थोडा आधार झाला आहे. फुले लागण्याच्या, तर काही ठिकाणी बोंडे लागण्याच्या अवस्थेतील कापसाला पावसाने बळ मिळाले. शेंगा लागण्याच्या अवस्थेतील सोयाबीन आता चांगले येऊ शकेल. या पावसाने तूर जोमदार येऊ शकते. नगर जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र, रविवारी पावसामुळे पिकांना आधार झाला. उत्पादन थोडे घटणार असले तरी काहीतरी हाती पडेल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

कमी दाबाचे क्षेत्र कायम
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनुसार, आग्नेय विदर्भ आणि परीसरावरील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. जम्मू-काश्मिरच्या पुर्वेकडील चक्राकार वारे उत्तरेकडे सरकत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण, खान्देशावरील आभाळ टिकून असल्याने येत्या तीन- चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे. 

राहुरी: ब्राम्हणी येथे ओढ्याला पूर 
तब्बलदोन महिन्याच्या कालावधी नंतरआगमन झालेल्या मघा नक्षत्राच्या धुव्वाधार पावसाने राहुरी तालुक्याला धो, धो धुतले.राहुरी शिंगणापुर या मार्गावरील ब्राम्हणी ओढ्याला पाणी आल्याने आज दुपारपासुन वाहतुक ठप्प झाली होती. पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. शनीवारी मध्यरात्री सुरू झालेला धुव्वाधार पाऊस रविवारी सायंकाळी वाजेनंतरही सुरूच होता. पावसामुळे रविवारी तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. मृग नक्षत्रातील ठरावीक वेळात झालेल्या पावसाचा अपवाद वगळता आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा ही पावसाळ्यातील खात्रीची चार नक्षत्रे कोरडी गेल्याने राहुरीचा शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. शनिवारी पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. 

श्रीगोंद्यात प्रथमच मोठा पाऊस 
तालुक्यातरविवारी पहाटे पासून सांयकाळ पर्यँत सार्वत्रिक धो-धो पाऊस झाल्याने तालुका ओलाचिंब झाला आहे. अडीच महिन्यातील हा पहिला मोठा पाऊस आहे.
रोहिणी मृग नक्षत्र तर पूर्ण कोरडे गेले. त्या नंतरच्या नक्षत्रात पावसाने दडी मारली. ७५ दिवसातील हा पहिला मोठा पाऊस आहे. रविवारी सकाळी आठ पर्यँत ४५ मि. मि. पाऊस नोंदवला गेला. दिवसभर सुरु असलेला पाऊस मात्र किती मि. मि. होता हे समजू शकले नाही. जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंद ओसंडून वाहत होता. बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पावसाने बळीराजाला मोठा दिलासा दिला. शेतातील खाचरे, नाले ताली पाण्याने गच्च भरल्या होत्या. अनेक ठिकानो ओढे नाले ओसंडून वाहत होते. सरस्वती नदीला या मोसमातील पहिला पूर आला. हे पाणी पाहण्यासाठी बायपास रस्त्यावर गर्दी उसळली होती. सार्वत्रिक झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. कुकडीच्या पाणलोट क्षेत्रात देखील संततधार सुरु असल्याची माहिती येथे समजली. चासकमान धरणातून भीमा नदीत २२ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. तर घोड धरणातून हजार क्युसेकने घोड नदीत पाणी सोडण्यात आले आहे. घोड धरणात पाण्याची आवक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. कुकडी समूहातील सर्वात मोठे डिंभे धरण शनिवारी ९८ टक्के भरले. 

नेवासे तालुक्यात ओढे तुडुंब 
भेंडे,कुकाण्यासह सोनई, चांदे, घोडेगाव, नेवासेफाटा, भानसहिवरे, गेवराई, सौंदाळे, शिरसगाव, तेलकुडगाव, पाथरवाले, देडगाव, माका, देवगाव, चिलेखनवाडी, देवसडे, वडुले, अंतरवाली, शिकारी नांदूर, सुकळी, तरवडी, सुलतानपूर, पिंप्रीशहाली, वाकडी, गोपाळपूर, परिसरात संततधार पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारी सायंकाळी भीज पावसाचे आगमन झाले. रात्रभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, रविवारी दुपारी एक वाजेनंतर झालेल्या संततधार पावसाने लहानमोठे ओढे नाले नद्यांना खळखळून पावसाचे पाणी वाहिले. कुकाणे-घोडेगाव, माका-कुकाणे, चांदे-घोडेगाव मार्गावरील ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. अशीच परिस्थिती तरवडी-कुकाणे, तेलकुडगाव-चिलेखनवाडी, दहिगाव-कुकाणे या मार्गांवरही झाली. ठिकठिकाणच्या ओढे आजच्या पावसाने दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे पाणी ओसरेपर्यंत या रस्त्यांवर वाहतूक खोळंबली होती. दुपारी एक वाजता सुरू झालेला संततधार पाऊस तीन तासांहून अधिक वेळ सुरू राहिला. यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच दमदार पाऊस झाला. विशेष म्हणजे वादळ वारे होता बरसलेला आजचा पाऊस होता. या पावसाने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. 
 
पाथर्डी तालुक्यात ६३ मिमी पाऊस 
मघानक्षत्रातील भीज पावसामुळे तालुक्यातील खरिपांच्या पिकांना जीवदान मिळाले असून वाफसा होताच रब्बीच्या पेरण्यांना प्रारंभ होईल. भीज पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सकाळी आठ वाजता नोंदवलेल्या माहितीनुसार पाथर्डी येथे सर्वाधिक ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पाथर्डी ६३ (एकूण २७८), माणिकदौंडी ४५ (२४०), मिरी ४२ (१८५), करंजी ३४ (२१०), टाकळीमानूर ५० (२६२) मिलीमीटर एवढा पाऊस नोंदला गेला. तालुक्याच्या पूर्व भागातील तसेच तिसगाव परिसरातील बरेच बंधारे भरले असून सलग समतल चरामध्ये सर्वत्र पाणी साचले. आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून दातीरवाडी, पालवेवाडी, अकोला, चिंचपूर इजदे, मोहटे, भुतेटाकळी, मालेवाडी, भालगाव, मुंगुसवाडे आदी गावातील या वर्षी पूर्ण झालेले बहुतेक बंधारे भरले. राष्ट्रीय महामार्गावरील फुंदेटाकळी तनपूरवाडी येथील पर्यायी पुल वाहून गेले. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार होईपर्यंत वाहतूक बंद होती. काही वाहने खरवंडी कासार, नांदूर निंबादैत्य, कोरडगाव या मार्गाने पाथर्डीकडे सुरू होती. तिसगावच्या नदीला पूर आल्याने पर्यायी मार्ग बंद झाला. राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता एस. आर. गुंजाळ तहसीलदार नामदेव पाटील तसेच पोलिस प्रशासन यांनी बंद झालेला रस्ता सुरू करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिठुभाई शेख यांनी विविध ठिकाणी जाऊन पेढे वाटून स्वागत केले. 

नेवासे: साेनईच्याकौतुकी नदीला पूर 
तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आठ रस्ते बंद झाल्याने अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. सर्वच ओढ्यानाल्यांबरोबर सोनईच्या कौतुकी नदीला पूर आला. तालुक्यातील सोनई आणि नेवासा या दोन मोठ्या गावातील आजचा पोळ्याचा आठवडे बाजारावर पाणी पडल्याने व्यापारी नाराज झाले आहेत. मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस पहाटेपासून चागंलाच सुरू झाला. पहाटेपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नेवासे तालुक्यात सर्व केंद्रांवर मिळून १९ तारखेला १९३७ मिमी, तर २० तारखेला २२९८ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी पैकी ६० टक्के पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. 

पावसाने दीड महिना ताण दिल्यानंतर गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने त्रासलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या सणासाठी ज्या व्यापाऱ्यांनी मोठा माल भरला होता त्या व्यापाऱ्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. आज पोळ्याचा रविवारचा बाजार असल्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली असती ती उलाढाल पावसामुळे होऊ शकली नाही. 

संगमनेरात पावसाने दाणादाण 
गेल्याअनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे रविवारी संगमनेरात जोरदार पुनरागमन झाले. शहरासह तालुक्याच्या सर्वच भागात रविवारी दिवसभर सुर्यदर्शन देणाऱ्या पावसाने संगमनेरकरांची चांगलीच दाणादाण उडवली. पावसाने शहरातील रस्त्यारस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले तर ठिकठिकाणी खड्डे पावसाच्या पाण्याने भरुन गेल्याने त्याला डबक्यांचे स्वरुप प्राप्त झाले. रविवारी पुन्हा एकदा पाऊसाचे जोरदार आगमन झाले. तालुक्यात सर्वदुर दिवसभर पावसाची जोरदार संततधार सुरुच होती. रविवारची चाकरमान्यांची सुट्टी घरी बसून मस्त आरामात गेली. सोमवारी बैलपोळ्याचा सण साजरा होत आहे. सणाच्या आदल्या दिवशी रविवारी झालेल्या पाऊसामुळे चार वर्षापूर्वीच्या बैलपोळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. चार वर्षापूर्वीही असाच जोरदार पाऊस झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...