आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळा झाला सुरू, गावे मात्र अजून तहानलेली; मुळा धरणात पाण्याची आवक मंदावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - जिल्ह्याला वरदान ठरलेल्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणाला अद्याप नवीन पाण्याने स्पर्श केला नसून कोतूळ येथील आवकही मंदावली आहे. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर नसल्याने नवीन पाणी आले नाही. सध्या मुळा धरणात 5 हजार 484 दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा असून सोमवारी कोतूळ येथून 3200 क्युसेक्सने पाण्याची आवक चालू होती. मंगळवारी दुपारी आवक कमी होऊन 1584 पर्यंत खाली आली होती.

अकोले तालुक्यातून मुळा नदीचा उगम होतो, तेथून पाणी मुळा धरणात जमा होते. सध्या नवीन पाणी आलेले नाही. शेतकर्‍यांचे या पाण्याकडे लक्ष लागले असून या पाण्यावरच शेती व्यवसायासह औद्योगिक व सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या पाण्याचा मोठा तुटवडा असल्याने उसाची शेती धोक्यात आहे. रोहिणी व मृग नक्षत्राने चांगली कामगिरी केली नसल्याने बहुतांश भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी अल्प पावसावर पेरणी केल्याने पाण्याअभावी पिके जळून जाण्याचा धोका आहे. पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेल्या पिकांची अवस्था दयनीय आहे.

मुळा धरणाची साठवण क्षमता 26 हजार दशलक्ष घनफूट असून सध्याचा साठा पाहता धरण भरण्यासाठी आणखी 21 हजार दशलक्ष घनफूट नवीन पाणी लागणार आहे. लाभक्षेत्रातील जोरदार पावसावर धरणाची भिस्त अवलंबून आहे. यापूर्वीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना आहे. नदीपात्रातील बंधारे, वाळू उपशामुळे पडलेले खड्डे यांना पार करून धरणाकडे येण्यासाठी पाण्याला वाटचाल करावी लागते. त्यामुळे आवक सुरू झाली, तरी हे अडथळे पार करावे लागणार आहेत. नवीन पाणी येण्यास बराच अवधी लागणार आहे. ढगाळ हवामान असताना तालुक्यात पाऊस मात्र हुलकावणी देत आहे.