आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rainwater Harvesting Help To Increase Bore Water Level

रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे वाढली बोअरची पाणीपातळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - इमारतीच्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी आतापर्यंत वाया जात होते. रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर हे पाणी साठून बोअरमधील पाणीपातळी चार फुटांनी वाढली आहे. हा उपक्रम यशस्वी केला आहे सावेडीतील धर्माधिकारी मळ्यातील सुमन अपार्टमेंटमधील रहिवाशांनी.

मागील वर्षी नगरकरांना पाणीटंचाईची चांगलीच झळ बसली. यापुढील काळात पाण्याचा प्रश्न आणखी बिकट होणार असल्याने गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी साठवण्याचा विचार सुमन अपार्टमेंटमधील 12 फ्लॅटमधील रहिवाशांनी सुरू केला. प्रा. मंगेश जोशी, अप्पा कुलकर्णी, मांडे गुरूजी, प्रदीप कुलकर्णी, शिरीष रसाळ, भरत कुलकर्णी, संतोष सादुल, बालेश दंडवते, नितीन मुळे, प्रदीप बक्षी, प्रकाश पानसे या सर्वांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे ठरवले. कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करा, असा हट्ट सर्वांच्या गृहलक्ष्मींनी धरला. शांभवी जोशी यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.

रेनवॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रातील तज्ज्ञ इंजिनिअर राजकुमार मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्ट्रॅक्टर अजित मिर्शा यांनी या कल्पनेला मूर्त रूप दिले. त्यासाठी 44 हजार रुपये खर्च आला. सुमन अपार्टमेंट फेज चारमधील दोन इमारतींच्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी सुमारे 200 फूट लांबीच्या चार इंची पाइपचा वापर करण्यात आला. दोन्ही इमारतींवरील पाणी एकत्र करून आठ चेंबरद्वारे बोअरवेलमध्ये सोडण्यात आले. जुलैमध्ये झालेल्या पावसाचे सर्व पाणी बोअरवेलमध्ये सोडण्यात आल्याने त्यातील पाण्याची पातळी चार फुटांनी वाढली आहे. पावसाचे आणखी दोन महिने उरले असल्याने बोअरवेल पूर्ण चार्ज होऊन त्यातील पाणी उन्हाळ्यातही वापरता येऊ शकेल.


पारस रेनफ्लो योजना किफायतशीर
नगर येथील पारस समुहाने रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी लागणारे साहित्य उत्पादित केले आहे. छतावरील पावसाचे पाणी साठवण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी ही योजना किफायतशीर व उपयुक्त आहे, असे कंपनीचे संचालक संतोष बोथरा यांनी सांगितले. छतावरील पाणी पीव्हीसीच्या अर्धगोल पाइपद्वारे एका ठिकाणी जमा करता येते. एक थेंब पाण्याचाही यात अपव्यय होत नाही. प्रत्येक घरात, बंगल्यात, कार्यालये, शिक्षण संस्था तसेच कारखान्यांत ही योजना राबवता येते, असे ते म्हणाले.


30 टक्के गरज भागेल
सर्वसाधारणपणे 1000 चौरस फुटांच्या गच्च्ीवर एका सिझनमध्ये पडणारे पावसाचे पन्नास हजार लिटर पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग करून साठवता येते. हे पाणी बोअरवेलमध्ये सोडता येते किंवा फिल्टर करून हौदात साठवता येते. त्यातून पाण्याची तीस टक्के वार्षिक गरज भागू शकते. एकदा खर्च केल्यानंतर 15 ते 20 वर्षे कोणताही खर्च करावा लागत नाही. सोसायटीतील सर्व फ्लॅटधारकांनी एकत्र येऊन अशी योजना राबवल्यास खर्चही कमी येतो.’’ राजकुमार मुनोत, इंजिनिअर.