आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raja Virbhadra Temple's Top Golden Poration Steal

पाथर्डी तालुक्यातील राजा वीरभद्र मंदिराच्या 25 लाखाच्या सुवर्णकळसाची चोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी (जि. नगर) - मिरी (ता. पाथर्डी) येथील राजा वीरभद्र मंदिराचा पंचधातूचा सुमारे 25 लाख रुपये किमतीचा सुवर्णकळस शनिवारी रात्री चोरीस गेला. पोलिसांनी श्वानपथकाद्वारे तपासणी केली, मात्र आरोपीचा शोध लागला नाही. तातडीने छडा लावावा, या मागणीसाठी मिरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रविवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

पाथर्डीपासून तीस किलोमीटर अंतरावर पांढरीपूल रस्त्यावर मिरी हे गाव असून गावाच्या मध्यभागी वीरभद्र मंदिर आहे. रविवारी सकाळी पुजारी सीताराम भगत पूजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिराचा कळस नसल्याचे दिसले. ही वार्ता कळताच ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. पोलिस उपअधीक्षक संजय बारकुंड घटनास्थळी आले. आरोपींना 24 तासांत अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे केली. गावात तीन शस्त्रधारी पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, औटपोस्ट दुरुस्त करावे, असेही ग्रामस्थ म्हणाले. आमदार शिवाजी कर्डिले यांनीही या घटनेचा छडा न लागल्यास विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा दिला.

आज नवा कळस बसवणार
मिरी येथील मंदिराचा कळस सहा महिन्यांपूर्वीच बसवण्यात आला होता. सतरा किलो वजनाचा हा कळस शिर्डी येथील एका भाविकाने दिला होता. या भाविकाला चोरीची माहिती कळताच त्याने दुसरा पंचधातूचा कळस आणला. नागरिकांनी त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली. सोमवारी कळस बसवण्यात येणार आहे.