आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळाचा आग्रह केल्यास ‘आपको भी ले डुबेंगे..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्रपक्ष आहे. आमच्या उमेदवाराने निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरावे, अशी अट त्यांनी घातली आहे. ही अट रद्द न केल्यास आम्ही लोकसभेच्या वीस जागा लढवू. मग ‘हम भी डुबेंगे और आपको भी ले डुबेंगे’ असा खणखणीत इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

गवई म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी अमरावतीची जागा घड्याळ चिन्हावर लढवण्याची अट घातली. राष्ट्रवादीचे अमरावती मतदारसंघाचे निरीक्षक अनिल देशमुख व आमदार प्रकाश डहाके, रिपाइंचे ज्येष्ठ नेते तथा राज्यपाल रा. सू. गवई यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी गवई यांनी घड्याळाऐवजी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. चिन्हाची अट घालणे, हा डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अपमान आहे. राष्ट्रवादीने हट्ट न सोडल्यास रिपाइं 20 जागा लढवेल. हम भी डुबेंगे और आपको भी ले डुबेंगे अशी भूमिका आम्ही घेऊ. अमरावती मतदारसंघात रिपाइं उमेदवाराला दोन लाखांहून अधिक मते मिळतील, असा आमचा विश्वास आहे. हिंगोली, यवतमाळ, मुंबई, बुलढाणा, रावेर, शिर्डी व नागपूर लोकसभा मतदारसंघात आम्हाला निश्चितच 75 हजारांहून अधिक मते मिळतील. त्यामुळे राष्ट्रवादीने विषाची परीक्षा पाहू नये, असे डॉ. गवई म्हणाले.

राष्ट्रवादीला उमेदवार म्हणून डॉ. राजेंद्र गवई चालतो, पण आंबेडकरी विचार चालत नाही का, हा सवाल शरद पवार यांना विचारणार आहोत. आठवडाभरात हा प्रश्न सुटला नाही, तर उमेदवार जाहीर करण्यात येतील. नंतर आमच्यासमोर इतर पर्याय देखील खुले असतील, असेही डॉ. गवई यांनी सांगितले.