आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Rajale News In Marathi, Vruddheshwar Milk Cooperative, Nagar

राजळे यांच्या समोरील अडचणीत भर,वृद्धेश्वर दूध संघातील गैरव्यवहाराची होणार सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाथर्डीच्या वृद्धेश्वर सहकारी तालुका दुग्ध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादीत संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात 15 एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी पाथर्डी प्रथमवर्ग न्यायालयाने राष्ट्रवादीचे नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजीव राजळे यांच्यासह 17 जणांविरुद्ध प्रोसेस इश्यू केलेली आहे. प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाला जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
वृद्धेश्वर दूध संघाने 2008-09 या आर्थिक वर्षात सभासदांसाठीच्या लाभांशाचे (रिबेट) 68 लाख रुपये काढून घेतले. मात्र, या लाभांशाचे सभासदांना वाटप झाले नाही.


लेखापरीक्षकांनी यावर कडक ताशेरे ओढले आहेत. कौडगाव येथील इंदिरा गांधी दूध संघाच्या संचालिका शशिकला पंढरीनाथ आठरे यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारात कागदपत्र मिळवून पाथर्डीच्या प्रथमवर्ग न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून संघाचे अध्यक्ष राजीव राजळेंसह 17 जणांविरुद्ध प्रोसेस इश्यू केली. प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाला संघाच्या कार्यकारी अधिकार्‍याने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले.


जिल्हा न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. म्हणणे मांडण्याच्या नोटिसा आठरे यांना दिल्या. त्यानुसार फिर्यादी पक्षाने लेखी म्हणणे सादर केले आहे. तर संघाचे अध्यक्ष राजळे यांनी म्हणणे मांडण्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतला आहे. जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्यासमोर याप्रकरणी कामकाज सुरू आहे. 15 एप्रिलला पुढील सुनावणी आहे.


विरोधकांच्या हाती आयते कोलीत
राजळेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार खासदार दिलीप गांधी यांच्यावर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने टिकेचे रान उठवले आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीच्या हाती पाथर्डी दूध संघातील गैरव्यवहाराचे आयते कोलीत मिळाल्याचे चित्र आहे. अर्बन बँकेतील गैरव्यवहाराच्या आरोपांना उत्तर देताना महायुतीच्या नेत्यांकडून या मुद्दय़ाचा वापर होण्याची शक्यता आहे.