आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीचे प्रश्न मार्गी लावू - राम शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्ह्यामध्ये एकूण भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान यामुळे वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या स्वरुपाचे शेतीविषयक प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व प्रश्नांचा साकल्याने विचार करून त्यावर मात करण्यासाठी शासन ताकदीने प्रयत्न करत आहे.
शासन अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवत असून पुढील काळातही अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या जोमाने पुढे चालवण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील महसूल, कृषी अन्य खात्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जलशिवार अभियानाला एक दिवसाचे आपले वेतन देऊन योगदान दिले आहे, तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठीचा निर्धार स्पष्ट केला आहे. जिल्ह्यातील संबंधित गावातील शेतकरी, नागरिक अन्य घटक या अभियानामध्ये सर्वार्थाने सहभागी होतील हा कार्यक्रम यशस्वी करून पाणीटंचाईमुक्त अशा स्वरुपाचे चित्र या गावांमध्ये निर्माण करू शकतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात गारपीट, अवकाळी पाऊस अशा स्वरुपाची संकटे निर्माण झाली. शासनाने याबाबत शेती व्यवस्थेला मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. अन्य हंगामातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नवीन निकषांनुसार मदत देऊन अडचणीत सापडलेल्यांना उभे करण्याचा शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी या वेळी दिली.

जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमधील पाणी वापर करणाऱ्या गावांसाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करून पाण्याची बचत अचूकता आणण्याची योजना जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून राबवली जात आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या नागरिकांच्या नळजोडांवर मीटर बसवून पाणीबचत, वीजबचत ग्राहकांच्या बिलांमध्ये बचत अशा गोष्टी साध्य केल्या जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचा अवलंब सर्व गावांनी करून योग्य प्रकारे पाणीपुरवठ्याची सोय करावी, असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या आवश्यक गरजा विचारात घेऊन त्यांना वेगवेगळ्या सेवा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पुरवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामध्ये ऑनलाइन दाखले, सात-बारा देणे, अभिलेख कक्षातील जुनी कागदपत्रे पुरवणे अन्य सेवांबाबत जिल्ह्यातील कामगिरी राज्यात उत्तम आहे, असे मंत्री शिंदे म्हणाले.
नगर जिल्ह्याचे वैभव असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासाबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येऊन हा किल्ला पर्यटकांना खुला करण्यात येत असलेली कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
सिध्दटेक, देवगड या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी नुकताच निधी देण्यात आला असून त्याचा उपयोग पर्यटकांना योग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या समारंभास स्वातंत्र्यसैनिकांसह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपविभागीय अधिकारी वामन कदम, संतोष भोर, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अशोक खैरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली भावे यांनी केले.

बाह्यवळण रस्ता

नगर शहरातील बाह्यवळण रस्ता ३६ किलोमीटरचा असून त्यापैकी शेंडी, मनमाड, विळदघाट, कल्याण रस्ता, पुणे रस्ता अशा २३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित १३ किलोमीटर लांबीच्या वळणरस्त्याचे काम प्रगतिपथावर असून हा रस्ता लवकरच अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. शिर्डीतील बाह्यवळण रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे पालकमंत्र्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

पुरस्कारांचे वितरण

पालकमंत्रीशिंदे यांच्या हस्ते २०१४ चा जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथील डी. आर. मेहेत्रे यांना, तर पोलिस विभागातील साहेबखान कलंदरखान पठाण, शनिधर बाबूलाल त्रिंबके, शहाजी महादेव आढाव यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले. १६ स्काऊट विभाग शाळांना गाइड राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत १२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पारितोषिके देण्यात आली.

ठिबकसाठी अाग्रह

ठिबकसिंचनाचा अवलंब मोठ्या प्रमाणात करावा, यासाठी पात्र अनुदान वाटण्यात येत आहे. २०१२-१३ मध्ये ५९ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी ४१ कोटी शेतकऱ्यांना वाटण्यात आले. २०१४-१५ मध्ये २७ कोटी ४९ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करणे, पाण्याचे पुनर्भरण रोहयोच्या माध्यमातून शेततळी उभारणे या कामाचा अवलंब करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.