आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्री राम शिंदे यांनाच हेल्मेटचे वावडे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनीच विनाहेल्मेट पोलिस कवायत मैदान ते प्रेमदान चौक असा दोन किलोमीटरचा प्रवास मोटारसायकलीवरुन केला. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वत: हेल्मेट घालून दुचाकी चालवली, पण पालकमंत्र्यांनी मात्र विनाहेल्मेट दुचाकी चालवून वेगळाच ‘आदर्श’ उभा केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. न्यायालयानेही हेल्मेट बंधनकारक केले आहे. फेब्रुवारीपासून हेल्मट घालणे राज्यभर बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे, आैरंगाबाद आदी शहरांत या नियमाची कडक अंमलबजावणी होत असताना राज्याच्या अन्य भागात मात्र अजूनही विनाहेल्मेट वाहने चालवली जातात.

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपने राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले. मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: हेल्मेट घालून दुचाकी चालवली. त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मात्र वाहतूक नियमांना बगल देत १५ ऑगस्टला पोलिस कवायत मैदान ते प्रेमदान चौक असा दोन किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरुन विनाहेल्मेट केला. विशेष म्हणजे त्यांच्यापाठीमागे पोलिसांची वाहनेदेखील होती. एरवी सर्वसामान्य दुचाकीचालकाकडे हेल्मेट नसले की, वाहतूक पोलिस दंड वसूल करतात. मात्र, राज्याचे गृहखाते काही महिने सांभाळणाऱ्या शिंदे यांनाच वाहतूक नियमांचा विसर पडला. या बेशिस्तपणाची चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये विनाहेल्मेट स्कूटर चालवली होती. ही छायाचित्रे प्रसिध्द झाल्यानंतर गडकरींवर टीका झाली होती. गडकरी यांच्यावर झालेली अशा प्रकारची टीका आपल्यावर होऊ नये, याची काळजी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंुबईत झालेल्या तिरंगा रॅलीत हेल्मेट घालून दुचाकी चालवली. तथापि, मंत्री शिंदे यांनी गडकरींचाच कित्ता गिरवला.

स्वातंत्र्यदिनी भाजपतर्फे निघालेल्या तिरंगा रॅलीची ही दोन दृश्ये. नगरचे पालकमंत्री हेल्मेट घालता दुचाकी चालवत होते. मुख्यमंत्र्यांनी मात्र नियम पाळून हेल्मेट परिधान केले होते.

सत्ताधाऱ्यांनी भान ठेवायला हवे
^काही काळ गृहराज्यमंत्रिपद भूषवणारे पालकमंत्री राम शिंदे यांना जबाबदारीचे भान असू नये, हे दुर्दैव आहे. नियम मोडणे म्हणजे सत्तेच्या मस्तीचे द्योतक आहे. किमान मुख्यमंत्र्यांचे जवळचे म्हणून तरी त्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक होते. पालकमंत्र्यांनीच जर नियम मोडला, तर जनतेने कुणाचा आदर्श घ्यायचा? शिंदे यांनी नियम मोडून चुकीचा संदेश दिला.'' श्यामअसावा, सामाजिक कार्यकर्ते, नगर.

मंत्री असले, तरी दंडास पात्र...
^हेल्मेटची सक्ती नसली, तरी हेल्मेट घालणे १९८८ च्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. हेल्मेट घालता दुचाकी चालवल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद कायद्यात आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवणारा कुणीही असो, मंत्री जरी असले किंवा स्वत: मी जरी असलो, तरी दंड वसूल करण्यात यावा. मोटार वाहन कायदा सर्वांसाठी सारखाच आहे.'' दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य.
बातम्या आणखी आहेत...