नगर - भारतीय जनता पक्ष हा जगात सर्वाधिक सदस्य असलेले पक्ष झाला आहे. भाजपचा कार्यकर्ता याआधी विरोधी पक्षात असल्यामुळे त्याची मानसिकता विरोधी पक्षाची बनली आहे. कार्यकर्त्यांनी यापुढे मात्र केंद्र राज्य सरकारबाबत नकारात्मक न बोलता जनतेसमोर सकारात्मक भूमिका मांडली पाहिजे, असे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.
]नगर जिल्हा भाजपच्या महासंपर्क अभियानाच्या कार्यशाळेत शिंदे बोलत होते. खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. भानुदास बेरड, सदा देवगावकर, रवी बोरावके, नितीन कापसे, सचिन तांबे, नामदेव राऊत, अनिल शर्मा, प्रकाश चित्ते, जालिंदर वाकचौरे, सुरेखा विद्ये, छाया रजपूत आदी या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, सरकारची भूमिका निर्णय हे वारंवार जनतेला सांगितले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र टंचाईमुक्त करायचा आहे. त्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कायम विजेच्या भारनियमनाच्या संकटाला तोंड द्यावे लागते. त्यावर पर्याय म्हणून सरकार शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषिपंपासाठी अनुदान देत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केंद्र राज्य सरकारबाबत नकारात्मक बोलता सरकारबाबत सकारात्मक भूमिका जनतेसमोर मांडावी.
सरकार ९९ टक्के प्रश्न सोडवत आहे. दूधभुकटी दूध यांच्या दरातील तफावत कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. शेतकरी सध्या दुष्काळाला सामोरे जात आहेत. गेल्या सहा महिन्यांत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान दिले आहे. यापूर्वीच्या सरकारचे देणेही आम्ही सहा महिन्यांत दिले. यापूर्वीच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्याने फायली मंत्रालयात पडून राहत होत्या.
आता मात्र फायलीवर तातडीने निर्णय घेतले जातात. या सरकारची निर्णय घेण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्री लोकहिताचे निर्णय घेतात. आलेल्या प्रत्येक माणसाचे काम करायचे ही त्यांची भावना आहे. सरकार चांगले काम करत असल्यामुळे पक्षाची सदस्य नोंदणी बंद झाली असतानादेखील सदस्यसंख्या वाढत आहे. पक्षाने हाती घेतलेले महासंपर्क अभियान प्रभावीपणे राबवा. सध्या राजकारणाचे स्वरूप बदलले आहे. "जय हरी' म्हणणारेदेखील आमदार होतात. जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी
आपल्याकडे पावणेदोन वर्षांचा कालावधी आहे. शिर्डी शनििशंगणापूर देवस्थानचा अध्यक्ष भाजपचाच असेल, असे शिंदे म्हणाले.
पाचपुते म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कुणाबरोबर जायचे, कुणाला पाडायचे याबाबत संभ्रम आहे. या निवडणुकीत पक्ष कुठे आहे? गळ्यात पट्टा बांधला म्हणजे मी पक्षाचा आहे असा अर्थ होत नाही. मी तर रोजच पट्टा बांधून फिरतो. जिल्ह्यात पक्षाच्या बैठका होत नाहीत. किल्लेवाले जास्त झाले आहेत. मी माझा किल्ला यापुरतेच पाहू नका. दुष्काळाची स्थिती गंभीर झाली आहे. पालकमंत्र्यांनी दुष्काळाच्या कालावधीत लोकांमध्ये मिसळावे.
फळबागांना पाणी मिळाले नाही, तर शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होईल. सरकार जरी आपले असले, तरी पाण्याबाबत निर्णय घेतले गेले नाही, तर नुकसान सहन करावे लागेल.
आमदार कर्डिले म्हणाले, सरकारने घेतलेले निर्णय घेतले तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. पक्षाचे कार्यकर्ते नकारात्मक बोलले, तर त्याची मदत विरोधकांना होईल. कुठलेही सरकार १०० टक्के समाधान करू शकत नाही. गेल्या पंधरा वर्षांत आधीच्या सरकारने जी घाण केली, ती महिन्या-दोन महिन्यांत स्वच्छ होऊ शकत नाही. सरकारकडे जादूची कांडी नाही. प्रत्येक महिन्यात तालुक्याच्या ठिकाणी महासंपर्क अभियान सुरू झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. भानुदास बेरड यांनी केले.
शेतकरी नाराज नाहीत...
तंबाखू बाबतवादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार दिलीप गांधी म्हणाले, दुधाचे, कांद्याचे भाव कमी होणे हा आजचा विषय नाही. हा दैनंदिन विषय आहे.भूमी अधिग्रहण कायद्यामुळे कोठलेही शेतकरी नाराज नाहीत. मात्र काँग्रेसकडे आज कुठला दुसरा विषय नसल्याने ते हा मुद्दा उचलून धरत आहेत.भूमी अधिग्रहण कायद्यामुळे सुपा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला भाव मिळाला, असे ते म्हणाले.
मरगळलेल्यांना डोस
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा येणे अपेक्षित असताना उलट मरगळ आली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी महासंपर्क अभियानाचा डोस पाजून ही मरगळ झटकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न गटबाजीमुळे कितपत यशस्वी होईल, याबाबत शंका आहे.
जिल्हाध्यक्ष कशाला?
गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष नसतो तेव्हा पक्षाची ताकद वाढते, मात्र जिल्हाध्यक्ष असताना तसे होत नाही. जिल्हाध्यक्ष नसताना लोक निवडून येतातच ना, असे सांगितले. त्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी जिल्हाध्यक्ष हा आजच्या चर्चेचा विषय नाही. पक्षाची यंत्रणा मजबूत आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष नसतानाही पक्षाचे काम चालते, असे स्पष्ट केले. आमदार शिवाजी कर्डिले यांनीही पक्षाला जिल्हाध्यक्ष नसला, तरी यश मिळते असे सांगून जिल्हाध्यक्ष निवडीत कोणालाच आता रस नसल्याचे सांगितले.
माझी अडचण नाही...
जिल्हा बँकेत माझी काही अडचण राहिली नाही. त्यामुळे आता आपण खेळ करायला मोकळे आहोत. आमच्या काही चुका झाल्या. ज्या वेळी निर्णय घ्यायचे होते, त्यावेळी निर्णय घेतले नाहीत. मात्र, आम्ही एका काँग्रेसला दोन काँग्रेमसध्ये ठेवण्याचे काम केले. जिल्हा बँकेचा पुढील अध्यक्ष हा भाजपचाच असेल.'' शिवाजी कर्डिले, आमदार.
फोटो - भारतीय जनता पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या महासंपर्क अभियान कार्यशाळेत बोलताना पालकमंत्री राम शिंदे.