आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athavle Appeal For Shindes Murder Case CID Inquairy

शिंदे खूनप्रकरणाची सीआयडी चौकशी करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दलित युवक सनी शिंदे याच्या खूनप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

सनीच्या अंत्यविधीसाठी आठवले नगरला आले होते. नंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सनी बालसुधारगृहातून पळून गेला, की त्याचे अपहरण केले, याची संपूर्ण चौकशी सीआयडीमार्फत करणे आवश्यक आहे. या प्रकरणातील आरोपी राजकीय पार्श्वभूमीचे आहेत. शिंदे कुटुंबाला आरोपींकडून धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी या कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे. ही घटना मानवजातीला चीड आणणारी आहे. नगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर दलित अत्याचार होत आहेत. राज्यातही हे प्रमाण मोठे असून ते कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अतिरिक्त पोलिस अधीक्षक नेमण्याची मागणी मी शासनाकडे करणार आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून नगर जिल्हा अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा, असे आठवले म्हणाले.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दलित अत्याचारांच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करावे, या प्रकरणांचा तपास जलद गतीने लावावा, अशी मागणीही आठवले यांनी केली. जिल्ह्यातील दलित हत्याकांडे प्रेमप्रकरणातून झाली आहेत. विविध जाती-धर्मांच्या लोकांनी आंतरजातीय विवाह करावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांना पक्षातर्फे एक लाख रूपयांच्या मदतीची घोषणा आठवले यांनी यावेळी केली. रिपब्लिकन पक्षाचे जयंत गायकवाड, शहर अध्यक्ष अजय साळवे, अशोक गायकवाड, सुजय म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.