नगर- मला मिळालेल्या या पुरस्काराचे खरे मानकरी ज्यांनी मला घडवले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्याच चरणी हा पुरस्कार मी अर्पण करतो. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील अकरा कलमे ठाकरे यांनी त्यावेळी काढली नसती, तर हिंदू संपला असता, असे प्रतिपादन आमदार रामदास कदम यांनी सोमवारी केले.
राष्ट्रसंत तनपुरेबाबा राज्यस्तरीय मराठा भूषण पुरस्कार कदम यांना ओम गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बद्रिनाथ महाराज तनपुरे, आमदार अनिल राठोड, अ. भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी दहातोंडे, हर्षदा काकडे, माजी महापौर शीला शिंदे व भगवान फुलसौंदर उपस्थित होते.
कदम म्हणाले, मी कोकणातील माणूस. सह्याद्रीच्या कुशीत मी जन्म घेतला. अशा माणसाचा पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने व साधू-संतांच्या सान्निध्यात सन्मान होतोय, याचा विशेष आनंद आहे. आदिवासी भागात काम करत असताना तेथील तीन हजार नागरिकांसाठी धान्य, कपडे आदी सािहत्याचे वाटप केले. मी मोफत वृद्धाश्रम व लष्करी प्रशिक्षण संस्था चालवतो. जनसेवा हीच ईश्वरसेवा हाच संदेश तनपुरे महाराजांनी दिला आहे. त्यांचा आदर्श घेऊन सर्वांनी काम करावे.
बद्रिनाथ महाराज म्हणाले, मराठ्यांना एकत्र करणे सर्वात अवघड काम आहे. समाजासाठी अहोरात्र झगडणारा नेता असायला हवा. प्रथम
आपणच आपल्याला आेळखावे, तेव्हाच जग तुम्हाला ओळखेल. जिथे दुष्काळ, भूकंप, महापूर अशा समस्या आल्या, त्या त्या ठिकाणी राष्ट्रसंत तनपुरे महाराजांनी सेवा केंद्र सुरू केले. राजकीय क्षेत्र ज्यावेळी परमार्थाकडे जाईल, त्यावेळी सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गप्पा मारून समाज सुधारत नाही...
दहा वर्षांपासून राष्ट्रसंत तनपुरेबाबा राज्यस्तरीय मराठी भूषण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी राज्यातून २२ प्रस्ताव आले होते. पुरस्कार देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आमदार रामदास कदम यांची निवड केली. त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गप्पा मारून समाज सुधारत नाही. त्यासाठी काही तरी करावे लागते हे त्यांनी दाखवून दिले आहे.” संभाजी दहातोंडे, आयोजक
अभ्यासू नेता असा असायला हवा...
नेता कसा असावा, हे आमदार कदम यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. अधिवेशन काळात विधानसभेत कोणते प्रश्न मांडायचे याचा कदम अभ्यास करतात. महाराष्ट्र राज्यासाठी कोणते कायदे असावेत?, काय प्रश्न मांडायचे याचाही अभ्यास असावा लागतो. तो अभ्यास आमदार कदम यांनी केला. कदम नगरला आले म्हणजे निश्चितच काहीतरी चांगले घडेल, असा विश्वास आमदार अनिल राठोड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.