आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- राज्य सरकारने मुस्लिम आणि मराठ्यांना दिलेले आरक्षण हे फसवणूक आहे. न्यायालयात ते टिकणार नाही. आरक्षणाचा निर्णय हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सोमवारी केला.येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत कदम बोलत होते. ते म्हणाले, मराठा व मुस्लिमांना देण्यात आलेले आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. हा निर्णय निव्वळ राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे ते म्हणाले.
सध्या संपूर्ण राज्यात दुष्काळ पडलेला आहे. अद्याप गारपीटग्रस्तांना मदत मिळालेली नाही. दुष्काळ म्हणजे राज्य सरकारसाठी पर्वणीच असते. दुष्काळ मदत वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महायुतीची सत्ता आल्यावर सर्व मंत्र्यांची चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले.शिवसेना व भाजपची युती ही एका विचाराने काम करणारी असल्यामुळे समन्वय होईलच. आगामी निवडणुकीत युती म्हणूनच काम करू. केंद्राकडून मिळणा-या शिष्यवृत्तीत 400 कोटींचा घोटाळा झाला आहे. तो ‘कॅग’नेच उघडकीस आणला आहे. जोपर्यंत महाराष्‍ट्रातील मराठी शिक्षण सचिव मिळत नाही तोपर्यंत शिक्षणाचा खेळखंडोबा चालूच राहणार आहे. युती सरकार आल्यावर केंद्राबरोबर काम करून महागाई निश्चित कमी करू, जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार, गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.