आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरूंपासून सोनियांपर्यंत सर्वांनी देश लुटून खाल्ला: रामदेवबाबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- कॉँग्रेस हा भ्रष्टाचारी, काळे धन गोळा करणार्‍यांचा पक्ष आहे. पंडित नेहरूंपासून विदेशी मॅडम सोनिया गांधीपर्यंत सर्वांनीच देश लुटून खाल्ला. अशा भ्रष्ट कॉँग्रेसला गाडून टाकायचे आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला शंभरही जागा मिळणार नाहीत, अशा शब्दांत योगगुरू रामदेवबाबा यांनी बुधवारी कॉँग्रेसवर हल्ला चढविला.

पतंजली योग आश्रमाच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांसाठी आयोजित महिला सशक्तीकरण महासंमेलनानिमित्त रामदेवबाबा शिर्डीत आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान पदासाठी शेकडो नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असले, तरी या पदासाठी सर्वात योग्य नरेंद्र मोदीच आहेत. कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा
कोणताही डाग लागलेला नाही. मोदी हे विकास पुरुष असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील गुंडा आणि माफिया राज प्रचंड वाढला आहे. ते नष्ट करण्यासाठी आपण महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचार सभा घेणार असल्याची घोषणाही रामदेवबाबांनी केली.


नितीशकुमार देतील मोदींनी पाठिंबा
येत्या लोकसभा निवडणुकीत आपला भाजपलाच पाठिंबा असेल, असेही रामदेवबाबा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ठासून सांगितले. कॉँग्रेस पक्ष सर्वात भ्रष्टाचारी असल्याने त्यांची सत्ता उखडून टाकण्यासाठी आपण देशभर सभा घेणार आहोत. किमान 300 खासदार निवडून आणण्याची व्यूहरचना आम्ही केली आहे. त्याचे दृश्य परिणाम निवडणुकीनंतर समोर येतीलच. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मोदींना निश्चित पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या तिसर्‍या आघाडीची चर्चा सुरू असली तरी, ते केवळ दिवास्वप्नच राहील, असा दावाही त्यांनी केला.

राहुलकडे अजेंडा काय?
गांधी परिवारावर हल्ला चढवताना रामदेवबाबा म्हणाले की, परदेशात उपचार घेण्याच्या नावाखाली सोनिया गांधींनी एजंट म्हणून काम केले. पंडित नेहरू ते विदेशी मॅडम (सोनिया गांधी) यांनीही हा देश लुटून खाल्ला आहे. राजीव गांधींनीसुद्धा बोफोर्स प्रकरणात एजंट म्हणून काम केले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची खिल्ली उडविताना ते म्हणाले, राहुल तर केवळ पत्रकार व विरोधी पक्षाची भूमिकाच बजावताना दिसतात. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. अशा नेत्याकडून काय अपेक्षा ठेवणार?

सीबीआय चौकशी कराच
हरिद्वारचे पंडित गुरूशंकर हे गेल्या काही वर्षांपासून गायब आहेत. याबाबत सीबीआय चौकशीची मागणी होत आहे? या प्रश्नावर रामदेव म्हणाले की, खुशाल करावी. पंडित गुरूशंकर हे माझे गुरू होते. त्यांच्या शोधासाठी ते माझी चौकशी करणार असतील तर मला आनंदच आहे. मात्र केवळ माझी बदनामी करण्यासाठी चौकशी करू नये, आतापर्यंत कॉँग्रेसने सीबीआय चौकशा लावून माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले आहे. मात्र आपण निर्दोष असल्याने सीबीआय चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. पुढेही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.