आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामेश्वर धबधबा कोसळू लागला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - जामखेडपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला रामेश्वर धबधबा गेल्या दोन दिवसांपासून कोसळू लागला असल्याने धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

सुमारे 350 फूट उंचावरून पडणारा धबधबा आणि निसर्गरम्य रामेश्वर मंदिर कायमच पर्यटकांना खुणावत असते. या परिसरात सुरुवातीला पावसाने ओढ दिली. मात्र, गेल्या चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे रामेश्वर धबधबा वाहू लागला आहे. रामेश्वर धबधब्याच्या मागील बाजूस असलेले विंचरणा नदीवरील मोठे लघु पाटबंधारे तलाव अद्याप भरलेले नसल्याने धबधबा असाच वाहत राहील की नाही याबाबत साशंकता आहे. सध्या दीड मीटर रुंदीची धार पडते आहे. पावसामुळे या परिसरातील वनराई हिरवीगार झाल्याने या ठिकाणी पर्यटकांना एक वेगळाच सुखद अनुभव मिळतो आहे.

राज्य सरकारच्या वनविभागाच्या बीड परिक्षेत्राच्या पाटोदा उपवन विभागामार्फत रामेश्वर परिसरात पर्यटनस्थळ विकास करण्यात आला आहे. फॉरेस्ट सव्र्हे नंबर 293 वर 326 मध्ये विविध प्रकारची वनराई फुलवतानाच पर्यटकांना जाण्या-येण्यासाठी छोटे रस्ते, पॅगोडा, वाहनतळ, व्ह्युह पॉइंट तसेच लहान आकाराचे साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. संपूर्ण फॉरेस्ट क्षेत्राला संरक्षक काटेरी कुंपण घालण्यात आले असून तेथे रोपवाटिकाही विकसित करण्यात आली आहे. रामेश्वर दरीच्या बाजूने पक्के संरक्षक कठडे बांधण्यात आले आहेत.