आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट: नगरमधील रस्त्यांच्या डागडुजीसाठी आठ लाखांची तरतूद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या डागडुजीसाठी महापालिकेने आठ लाखांचा निधी सोमवारी मंजूर केला. ‘खड्डयांमुळे नगरकरांची हाडे खिळखिळी’ असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 4 ऑगस्टला प्रसिध्द केले होते. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या मनप प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली. बुधवार (7 ऑगस्ट) पासून या कामाला सुरूवात होणार आहे.

दिल्लीगेट, लालटाकी, सज्रेपुरा चौक, बागडपट्टी, कुष्ठधाम आदी ठिकाणचे रस्ते खड्डयांत हरवले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाठदुखीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी पाठपुरावा करून वास्तव चित्र मनपा प्रशासन व नागरिकांसमोर ठेवले होते.

गेल्या पाच वर्षात रस्त्यांच्या डागडुजीवर झालेली एक कोटी रुपयांची उधळपट्टी ‘दिव्य मराठी’ने काही दिवसांपूर्वीच उघड केली होती. त्यामुळे जाग्या झालेल्या मनपा प्रशासनाने रस्त्यांच्या डागडुजीसाठी आठ लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. ठेकेदारांमार्फत ही कामे करण्यात येणार आहेत. मात्र, बिले वेळेवर मिळतील की नाही, अशी शंका ठेकेदारांना आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम करण्यास ठेकेदार तयार नाहीत.

याबाबत शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी म्हणाले, सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कमीत कमी 50 लाखांची आवश्यकता आहे. सध्या मनपाकडे इतका निधी नसल्याने आयुक्त विजय कुलकर्णी यांनी रस्त्यांच्या डागडुजीसाठी आठ लाख मंजूर केले आहेत. त्यातून प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील.