आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Case, Family Exploitation, Girls Teasing Women's Forum

अत्याचारित महिलाच देणार आता एकमेकींना आधार..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अत्याचारित महिलांनी संघटित होऊन बलात्कारित, कौटुंबिक अन्याय, अत्याचार, छेडछाड, बदनामी, फसवणूक अशा अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना आधार देण्यासाठी आधारगट सुरू केला. सोमवारी त्याचे उद्घाटन झाले. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच आधारगट आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 56 निर्भया आवर्जून उपस्थित होत्या.

समुपदेशिका शिल्पा केदारी यांनी आधारगटाची संकल्पना स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, विविध अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना न्यायव्यवस्था व प्रशासकीय यंत्रणेशी अनेकदा मोठा संघर्ष करावा लागतो. कुटुंब, समाज आदींकडूनही त्यांना अपमान सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना मानसिक, कायदेशीर आधाराबरोबरच सन्मान्य जीवन जगण्यासाठी सामाजिक स्वीकार व सहयोगाची आवश्यकता भासते. आधारगटाद्वारे या प्रश्नांप्रमाणेच स्वावलंबन व संरक्षणाचे धडे महिला, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दिले जाणार आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिली. सूत्रसंचालन संदीप कुसळकर यांनी केले, तर पूजा गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी सुवालाल शिंगवी, हनिफ शेख, संजय गुगळे, अनिल गावडे, कांचन कांकरिया, डॉ. सतीश राजमाचीकर, राजीव गुजर, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने संमत झालेल्या नव्या बलात्कारविरोधी कायद्याच्या माहिती पत्रकांचे लोकार्पण करण्यात आले. आधारगटाची बैठक प्रत्येक रविवारी स्नेहालय पुनर्वसन संकुलात सकाळी 9 वाजता होणार आहे. पीडित महिलांना अँड. श्याम आसावा, अँड. विनायक सांगळे, अँड. रमेश नगरकर यांच्यामार्फत मोफत कायदेशीर मार्गदर्शन दिले जाणार आहे. डॉ. प्रिती देशपांडे, डॉ. प्राची देशमुख, डॉ. नीरज करंदीकर, डॉ. मार्सिया वॉरन आदी तज्ज्ञांतर्फे मानसोपचार व वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यात येणार आहे.