आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Crime News In News In Marathi, Child Protection Act, Nagar

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, जिल्ह्यातील पहिलीच घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये जिल्ह्यातील पहिलाच निकाल गुरुवारी कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयाने दिला. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
शांताराम अर्जुन गोरासे (रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे. जानेवारी 2013 मध्ये आरोपीने नात्यातील मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणी सुरू असताना नव्याने आलेल्या लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 6 नुसार आरोपीविरुद्ध वाढीव दोषारोप ठेवण्यात आला. सरकार पक्षाकडून पीडित बालिकेसह दहा साक्षीदार तपासण्यात आले. विविध कलमांखाली तीन ते सात वर्षांच्या तीन शिक्षा व 17 हजारांचा दंड आरोपीला सुनावण्यात आला. या व्यतिरिक्त नव्या कायद्यानुसार आरोपीला न्यायालयाने जन्मठेप सुनावली. या सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. पीडित बालिकेला नुकसान भरपाई देण्यासाठी निकालाची प्रत जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील पी. सी. धाडीवाल यांनी युक्तिवाद केला.
आरोपीला सात वर्षांची शिक्षा
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायाधीश एस. के. एस. रझवी यांनी सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्याला मदत करणार्‍या दोघांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गणपत नारायण शिंदे (23, जयमल्हारनगर, नवनागापूर) असे सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बालाजी नारायण शिंदे व अमोल मनोहर साळवे हे त्याचे साथीदार आहेत. गणपतने डिसेंबर 2012 मध्ये मुलीचे अपहरण केले होते. या खटल्यात सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गणपतला सात वष्रे सक्तमजुरी, 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वष्रे कारावास, तर त्याच्या साथीदारांना दोन महिने कारावास व प्रत्येकी पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अँड. प्रकाश गायकवाड यांनी युक्तिवाद केला.