आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला जागवण्यासाठी राष्ट्रवादीचा "गोंधळ'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढून राज्य सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घातला. या आंदोलनाद्वारे सरकारी यंत्रणांचे दुष्काळाकडे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादीच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
श्रीगोंदे नगर विधानसभा मतदारसंघात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, या मतदारसंघांमध्ये गाव तिथे छावणी सुरू करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, दुधाला प्रतिलिटर ३० रुपये लिटर भाव द्या, प्रत्येक वाडी-वस्तीवर पाणी टँकर सुरू करावे, शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावी, रोहयोची कामे सुरु करावीत, या मागण्यांसाठी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड परिसरातून आसूड मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेले पोतराज आसूड घेऊन अंगावर सरकारच्या नावाने आसूड आेढून घेत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर तेथे सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालण्यात अाला.जागरण गोंधळापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जागरण गोंधळाला सुरुवात झाली. जागरण गोंधळात राहुल जगताप डफ वाजवत सहभागी झाले. त्यानंतर गोंधळी जगताप यांच्यात दुष्काळाच्या प्रश्नावरून कलगीतुरा रंगला. श्रीगोंदे तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, किसन लोटके, सोमनाथ धूत या वेळी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, दुष्काळाच्या प्रश्नावर सरकार झाेपलेे आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावे लागले. दुष्काळावर तातडीने उपाययोजन केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला. शिर्के म्हणाले, दुधाला भाव नाही, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. जनावरांसाठी चारा नाही, पाणी नाही.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार डोळेझाक करत असून सरकारला जागे करण्यासाठी हा आसूड मोर्चा काढला.

हास्य कल्लोळ
जागरण गोंधळ सुरू होण्यापूर्वी उखाणे घेण्याची पद्धत असते, त्यामुळे आमदार जगताप यांनी आता जागरण गोंधळात सहभागी झालेले नवरा-नवरी उखाणे घेणार असल्याचे जाहीर केले. त्या वेळी तेथील नवरा-नवरीने उखाणे घेण्यास सुरुवात केली. "चिक्की खाऊन कमावयाचे घबाड अन् भाऊसाहेबाचे नाव घेते सरकार आहे लबाड' अशा प्रकारचे उखाणे घेऊन हास्यकल्लोळ उडवून दिला.

सरकारची खिल्ली
मराठी चित्रपटातील अभिनेते नि‌ळू फुले दादा कोंडके यांच्या आवाजात अनिल पाटोळे या कार्यकर्त्याने दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारची चांगलीच खिल्ली उडवली. पाटोळे सरकारची खिल्ली उडवत असताना त्यांना उपस्थित शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मंत्र्यांना जिल्हाबंदी
^दुष्काळाच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना केल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. जलयुक्त योजनेतून पाणीसाठा वाढल्याचा जी माहिती दिली जाते, ती खोटी आहे. जलयुक्तची कामे करताना सरकार विरोधी पक्षातील आमदारांना डावलत आहे. कुकडीच्या पाण्याबाबतही दिशाभूल केली जात आहे.'' राहुल जगताप, आमदार,राष्ट्रवादी