आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीपेक्षा उपोषणाची ताकद मोठी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात केलेल्या उपोषणापुढे सरकार झुकले. माओवादी व नक्षलवाद्यांच्या बंदुकीत जास्त ताकद की एका माणसाच्या उपवासात, असा सवाल राष्ट्रीय युवा योजनेचे अध्यक्ष डॉ. एन. एस. सुब्बाराव यांनी केला.
राष्ट्रीय युवा योजना, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि सामाजिक संघटना व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय एकात्मता युवा शिबिराचे उद््घाटन शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. सुब्बाराव बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार, पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश, सुवालाल शिंगवी उपस्थित होते.
सुब्बाराव म्हणाले, भारताला अहिंसेमुुळेच स्वातंत्र्य मिळाले. अहिंसेचा केंद्रबिंदूच भारत आहे. हजारो नक्षलवादी निष्पाप नागरिकांचा बळी घेतात. तरुणाने स्वत:ला भारत निर्माता समजावे. प्रत्येकाने मी असताना भ्रष्टाचार होणार नाही, असा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. हजारे यांनी भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करण्याचे आवाहन केले.
डॉ. संजीव कुमार म्हणाले, तरुण देशाचे भवितव्य आहे. काश्मीर ते कन्याकुमारी संस्कृतीत विविधतेत एकता आहे. मात्र, देशात अनेक समस्या आहेत हेदेखील मान्य करणे गरजेचे आहे. देशातील सुमारे 5 कोटी जनता तज्ज्ञ आहे; पण त्यांना कधी संधीच मिळत नसल्याचे सांगितले. प्रास्ताविक संदीप कुसळकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘भारत की संतान’ या भारताची सांस्कृतिक विविधतेतील एकता अभिव्यक्त करणा-या कार्यक्रमाने झाली.
सिंघमने खाल्ला भाव! - अण्णा हजारे यांचे भाषण सुरू असताना उशिरा व्यासपीठावर पोहोचलेले पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांचा शालेय विद्यार्थ्यांनी ‘सिंघम...सिंघम’ असा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर त्यांनी शेरो-शायरीची झालर लावून केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या भाषणाला युवकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. उशिरा का होईना, पण सिंघम भाव खाऊन गेला.
प्रमुख मार्गावरून रॅली - भिंगार शहराच्या प्रमुख मार्गावरून देशभरातून आलेल्या शेकडो तरुणांनी एकात्मता जनजागृती रॅली काढली. स्नेहालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाचा प्रारंभ केला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते जॉय ऑफ गिव्हिंग पुस्तिकेचे प्रकाशन झाले.