आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये कांद्याचे भाव उतरले, परराज्यातून मागणी घटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या आठवड्यात तीन हजार दोनशे रुपयांचा भाव खाणारा कांदा आता मात्र आवक वाढल्यामुळे थोडा खाली उतरला आहे. बुधवारी जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झाले. तिन्ही ठिकाणी कांद्याच्या भावांमध्ये सुमारे 400 ते 500 रुपयांची घसरण झाली आहे. बाजारात कांदा गोण्यांची आवक वाढली असून मागणी काही प्रमाणात घटली असल्यामुळे भाव उतरले आहेत.

कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी 10 हजार 225 कांदा गोण्यांची आवक झाली. नंबर एकच्या कांद्याला 2 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 2 हजार ते 2 हजार 300 व तीन नंबर कांद्याला 1 हजार 800 ते 2 हजार 300 रुपये भाव मिळाला. कोपरगाव बाजार समितीत वैजापूर, येवला, मनमाड, राहाता येथील शेतकरी कांदा विक्रीसाठी आणतात. दर बुधवारी व शनिवारी असे आठवड्यातून दोन दिवस येथे कांद्याचे लिलाव होतात.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याचे लिलाव झाले. नंबर एकच्या कांद्याला जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 2 हजार 500 ते 2 हजार 800 रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 100 ते 2 हजार 400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 1 हजार 800 ते 2 हजार 100 व जोडकांद्याला 900 ते 1 हजार 200 रुपये भाव मिळाला.

पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी व बुधवारी असे आठवड्यातून दोन दिवस कांद्याचे लिलाव होतात.
नेवासे तालुक्यातील घोडेगाव उपआवारात बुधवारी 27 हजार 900 कांदा गोण्यांची आवक झाली. नंबर एकच्या कांद्याला 2 हजार 190 ते 2 हजार 600 रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 1 हजार 500 ते 2 हजार व तीन नंबर कांद्याला 600 ते 1 हजार 450 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2 हजार ते 2 हजार 300 रुपये व जोड कांद्याला 600 ते 1 हजार 500 रुपये भाव मिळाला. घोडेगाव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटकसारख्या परराज्यातील व्यापारी येतात. त्यामुळे शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत आहे.
बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी तो ठराविक गोण्यांनाच दिला जातो. इतर गोण्यांना मात्र मिळेल तो भाव पदरी पाडून घ्यावा लागतो. अर्थात शेतकर्‍यांसाठी सध्याचा भाव समाधानकारक असला तरी आवक व मागणीच्या प्रमाणामुळे हे भाव पुन्हा बदलतील, अशी शक्यता बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी वर्तविली आहे.

लाल कांदा दिवाळीनंतर बाजारात

पाणीटंचाईमुळे या मोसमात कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात सध्या लाल कांदा शिल्लक नाही. गावरान कांदाही दिसेनासा झाला आहे. बाहेरच्या राज्यातून कांद्याला मागणी असते. परराज्यात मागणी वाढल्यामुळे आपल्याकडे कांद्याला चांगला भाव मिळत आहे. पावसाला सुरुवात झाली असली तरी लाल कांदा मात्र दिवाळीनंतरच बाजारात येईल. उत्तम औताडे, सभापती, कोपरगाव बाजार समिती