आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा : रेशन दुकानदार, रॉकेल विक्रेते वाढीव कमिशनसाठी सामुदायिक राजीनामे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - शासनाने स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्री केंद्रचालकांना कमिशन वाढवून द्यावे; अन्यथा रेशन दुकानदार सामूहिक राजीनामे देतील, तसेच 28 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून ‘निषेध दिन’ पाळण्यात येईल, असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष देविदास देसाई यांनी सरकारला दिला आहे.

शनिवारी येथील शासकीय गोदामामध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्या वेळी देसाई बोलत होते. ते म्हणाले, विविध योजनांच्या लाभार्थींची काळजी घेणारे शासन रेशन दुकानदार आणि रॉकेल केंद्रचालकांकडे दुर्लक्ष करते आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच आम्हालाही महागाईचे चटके बसत आहेत. त्यामुळे कमिशन वाढवून देणे अत्यावश्यक आहे.

शासनापुढे मांडावयाच्या विविध मागण्यासंबंधी चर्चा बैठकीत करण्यात आली. देसाई म्हणाले, स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेता हा शासन व जनता या दोहोंमधील दुवा आहे. अनेक वर्षांपासून रॉकेलमध्ये केवळ 20 पैसे प्रतिलिटर, तर धान्यात केवळ 50 पैसे प्रतिकिलो कमिशन दिले जाते. महागाईच्या प्रमाणात यात कधीही वाढ झालेली नाही. दरवेळी विविध कारणांनी दरवाढ केली जाते, परंतु विक्रेत्यांना कमिशन वाढवून दिले जात नाही.

रेशन दुकानदार हा शासनाचा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याने त्यास चतुर्थर्शेणीचा दर्जा देऊन दरमहा वेतन द्यावे, पेन्शन योजना सुरू करावी अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. संघटनेच्या वतीने वधवा समितीलाही यासंबंधी विनंती करण्यात आली, परंतु समितीने रेशन दुकानदारांना अशा सवलती देणे शक्य नाही, असा निर्वाळा दिला, याचाही या वेळी निषेध करण्यात आला.

रेशन दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांचा बहुतांश वेळ नागरिकांना सेवा देण्याऐवजी विविध दस्तऐवज तयार करण्यात जात आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म भरायला लावणे बंद करावे किंवा फॉर्म भरणे, रजिस्टर तयार करणे, झेरॉक्स काढणे, खाते नंबर घेणे आदी कामांचा मोबदला द्यावा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.

14 फेब्रुवारी रोजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत विचारविनिमय होणार असून 28 फेब्रुवारीला शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध दिन पाळण्यात येणार आहे.

12 मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर विविध मागण्यांसाठी होत असलेल्या मेळाव्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले यांनी केले. या वेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे, सचिव रज्जाक पठाण, लाल महंमद जहागीरदार, पुंडलिक खरे, भाऊसाहेब काळे, भाऊसाहेब वाघमारे, हाजी ताजोद्दीन शेख, सुदेश कुलकर्णी आदींनी चर्चेत भाग घेतला. बैठकीस उपाध्यक्ष बबनराव गवारे, शांताराम बकरे, रवींद्र काळे, सुरेश मैड, रमेश अंभोरे, रामनाथ कवडे, अशोक सोनी, जयर्शी पारखे आदींसह अनेक दुकानदार उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले यांनी केले. आभार रज्जाक पठाण यांनी मानले.

मोबदला मिळावा
रेशन दुकानदार, तसेच रॉकेल केंद्रचालकांना विविध फॉर्म भरणे, तक्ते तयार करून देणे, लाभार्थींचा खाते नंबर देणे, झेरॉक्स काढणे आदी कामांसाठी पदरमोड करावी लागते. त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे अशा कामांसाठी मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

महागाईचे चटके
नागरिकांप्रमाणेच आम्हालाही महागाईचे चटके बसत आहेत. तोकड्या कमिशनमुळे मुलांचे शिक्षण, लग्न आदी जबाबदार्‍या निभावताना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे वाढीव कमिशन मिळणे आवश्यक आहे. ’’ देविदास देसाई, कार्याध्यक्ष, रेशन, रॉकेल दुकानदार संघटना