आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनचे धान्य काळ्या बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - रेशनच्या दुकानांमध्ये वाटप करण्यासाठी वितरीत करण्यात आलेले धान्य खुल्या बाजारात नेताना पोलिसांच्या विशेष पथकाने पकडले. सोमवारी (8 एप्रिल) संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. रेशन दुकानचालक आसाराम बबनराव रासकर (38, शेरकर गल्ली, माळीवाडा) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे.

रासकरचे सारसनगर येथील कर्पेमळ्यात पत्र्याच्या शेडमध्ये धान्य साठवण्याचे गोदाम आहे. तेथील रेशनचे धान्य काळ्या बाजारात जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे मिळाली. जिल्हा पुरवठा विभाग व विशेष पथकाने सोमवारी छापा टाकला असता सरकारी गहू व तांदूळ खासगी गोण्यात भरण्यात येत असल्याचे आढळले. साडेचारशे गोण्या गहू व दीडशे गोण्या तांदूळ सापडला. धान्य काळ्या बाजारात घेऊन जाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ लावलेला आयशर टेम्पो (एमएच 16 क्यू 6599), सहाशे गोण्या धान्य, इलेक्ट्रिक वजनकाटा पथकाने जप्त केला. पुरवठा निरीक्षक राजेंद्र जोग यांच्या फिर्यादीवरून रासकर, तसेच टेम्पोचालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.