आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअँलिटी शोनंतर लगेच पार्श्वगायनाची संधी मिळणे अवघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सध्याचे रिअँलिटी शो चांगले आहेत. त्यात सहभागी होणार्‍या प्रत्येक स्पर्धकाचे ध्येय हे चित्रपटातील पार्श्वगायक होण्याचे असते. तथापि, चित्रपटात पार्श्वगायनाची संधी मिळणे अवघड असते. आवाजाचा थ्रो, स्पष्ट उच्चार, आवाजाची गुणवत्ता, एक्सप्रेशन, व्हॉल्युम कंट्रोल, लाइट व म्युझिकचे प्रशिक्षण आणि नशिबाची साथ असेल, तरच पार्श्वगायक होता येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या आयएमएस संस्थेमध्ये बुधवारी संध्याकाळी ‘संवाद - प्रवास तेजस्विनीचा’ या कार्यक्रमात उत्तरा केळकर बोलत होत्या. नृत्यांगणा व अभिनेत्री आदिती भागवत व उत्तरा केळकर यांच प्रकट मुलाखत प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर यांनी घेतली. हा कार्यक्रम चांगलाच रंगला.

केळकर म्हणाल्या, मी दहा भाषांतील 425 चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. क्लासिकलपासून शिकायला सुरुवात केली. पहिल्यांदा आईकडून गाणं शिकले. चमकणे हे ध्येय न ठेवता चांगले गाणे कसे गाता येईल, हे माझे ध्येय होते. पंडित फिरोज दस्तूर, र्शीकांत ठाकरे यांच्याकडे मी गाणं शिकले. विश्वनाथ मोरे, राम कदम यांनी मला सांगितले, ‘‘सोज्वळ गाणी गायलीस, तर या क्षेत्रात तू टिकणार नाही. तुला लावणी आलीच पाहिजे.’’ लावणीतील उच्चार, चाल त्यांनी मला शिकवली. पार्श्वगायकाला प्रत्येक प्रकारचे गाणे यायलाच पाहिजे.

आदिती म्हणाली, आपल्या आतल्या मनाचं नातं कलेशी जोडलं जाणं फार महत्त्वाचं आहे. बाराव्या वर्षापासून मला नृत्याची गोडी निर्माण झाली. पंधराव्या वर्षी आग्रा येथील ताज महोत्सवात मला संधी मिळाली. ते नृत्य झाल्यानंतर गुरू म्हणाल्या, ‘‘बच्चीने अच्छा डान्स किया’’ गुरुंनी माझी खूप वर्षे परीक्षा घेतली. त्यांच्यामुळेच मला शिस्त लागली. हल्ली पालकांकडून मुलांना खूप प्रेशराइज केलं जातं. असं माझ्या आईने कधीच केलं नाही. गुरू मला नेहमी म्हणत - तू रोज पाच मिनिटेच रियाज केला, तर तोसुद्धा तुझ्या खात्यात जमा होईल..

उत्तरा केळकर यांनी कुठल्याही वाद्याची साथ नसताना गाजलेली गाणी यावेळी सादर केली. पाहुण्यांचे स्वागत एन. एम. अँस्टन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरसंचालक डॉ. शरद कोलते यांनी केले. सुरुवातीला गणेश वंदना सादर करण्यात आली. नंतर नृत्यमिलाफाचा अनोखा नृत्यप्रकार सादर झाला.