नगर- कथा-कथनाचाकार्यक्रम महाराष्ट्रात मराठी मातीत जसा रंगतो, तसाच तो सातासमुद्रापलीकडे फ्रान्समध्येही रंगू शकतो. याची प्रचिती पॅरीस येथील महाराष्ट्र मंडळाने अलीकडेच आयोजित केलेल्या प्रा. माधुरी शानभाग यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमात आली.
मूळचे नगरचे असलेल्या डॉ. शशी धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने फ्रान्समध्ये मराठीजनांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्यांनी नुकताच बेळगाव येथील लेखिका प्रा. माधुरी शानभाग यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रा. शानभाग यांनी सांगितलेल्या कथा फ्रान्समधील मराठी मंडळींना आवडल्या.
कथा कशा सूचतात, हेही प्रा. शानभाग यांनी सांगितले.
आसपास घडलेल्या घटनांमध्येच कथेचे मूळ असते. कधी वर्तमानपत्रांतील एखादी बातमी वाचून कथाबीज सापडते, असे त्या म्हणाल्या. स्त्री भ्रूणहत्येवर आधारित त्यांच्या कथेला उपस्थितांनी दाद दिली. भविष्यात घडू शकतील, अशा मानवी नात्याच्या, भावभावनांची गुंगागुंत असलेली विज्ञानकथाही त्यांनी सांगितली. मानवी क्लोनिंग शक्य झाले, तरी माणूस म्हणजे केवळ शरीर नव्हे, तर मन, हृदय अनुभवातून घडलेलं व्यक्तिमत्त्व हे सर्वस्वी वेगळं असू शकतं, हे सांगणारी "प्रतिमा' ही कथाही वेगळी होती.
उपस्थित श्रोत्यांनी प्रा. शानभाग यांच्याशी संवाद साधून मराठी साहित्यातील नवे प्रवाह जाणून घेतले. कथा कशी लिहावी, याविषयीही यावेळी चर्चा झाली.
प्रारंभी डॉ. धर्माधिकारी यांनी प्रा. शानभाग यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाला भारतीय दूतावासातील पोलिटिकल विभागाच्या स्मिता पाटील कोल्हापूरहून आलेले बापट दाम्पत्य उपस्थित होते. मंडळाच्या सचिव आशाताई राजगुरु यांनी प्रा. शानभाग यांना भेटवस्तू देऊन आभार मानले. फ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
पॅरीस येथे फ्रान्स महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात लेखिका प्रा. माधुरी शानभाग यांच्यासह तेथील मराठी मंडळी. सर्वात उजवीकडे मूळचे नगरकर असलेले डॉ. शशी धर्माधिकारी. सांस्कृतिक
भारतीय सैनिकांना आदरांजली
पहिल्यामहायुद्धात अनेक भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या पलटणींमधून लढत असताना युरोपात गेले होते. त्यातील काही फ्रान्समध्ये धारातीर्थी पडले. येत्या ३० ऑगस्टला त्यांच्या बलिदानाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त फ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ३० ऑगस्टला फ्रान्सच्या उत्तर विभागातील रीचबुर्ग येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.