आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने 5 गायी दगावल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - तालुक्यातील प्रवरा नदी काठाजवळील ढोकरी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे डझनभर ग्रामस्थांचे लचके तोडले होते. त्याचबरोबर गायी व वासरांना हा कुत्रा चावल्याने गायींना रेबिजची बाधा झाली. उपचार करूनही जनावरे रोगमुक्त न झाल्याने व वेदना पाहणे अवघड जात असल्याने ढोकरी येथील शेतकर्‍यांना नाईलाजास्तव आपल्या पाच गायींना ठार करावे लागले.

तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरातून 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक पिसाळलेला कुत्रा ग्रामस्थांसह जनावरांना चावा घेत सुटला. ग्रामस्थ झोपेत असताना कुत्र्याने गोठय़ातील जनावरांना चावे घेतले. एक डझनभर ग्रामस्थांचेही कुत्र्याने लचके तोडले. त्यानंतर ग्रामस्थांनी कुत्र्याचा शोध घेऊन अखेर त्याला ठार केले. परंतु कुत्रा ठार झाल्यानंतरही त्याची दहशत अद्यापही कायम आहे. ज्या ग्रामस्थांना व जनावरांना कुत्र्याने चावा घेतला. त्या सर्वांना रेबिजची बाधा झाली. या जनावरांना पशुचिकित्सालयात रेबिजचे इंजेक्शन दिले. परंतु उपचार करूनही मुकी जनावरे पिसाळली आहेत. या घटनेला एक महिना उलटूनही अनेक जनावरांना कुत्रा चावल्याचे लक्षात न आल्याने त्यांना उपचार मिळू शकले नाही.
पशुवैद्यकांनाही जनावरांच्या आजाराचे निदान करता आले नाही. रेबिजची बाधा झाल्याने श्वानदंश झालेली जनावरे पिसाळल्यासारखी करत होती. त्यामुळे ढोकरी येथील शेतकर्‍यांना पिसाळलेल्या पाच गायींना विजेचा शॉक देऊन ठार करावे लागले. ढोकरीतील भाऊसाहेब शेटे, अर्जुन शेटे, बाळासाहेब पानसरे, शंकर रेवगडे, विलास शेटे या शेतकर्‍यांनी काळजावर दगड ठेवून गायी ठार केल्या. त्यामुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झालेच त्याचबरोबर आपल्या प्रिय जनावरांना मारण्याचे पाप करावे लागले. रेबिजची बाधा झालेल्या गायींचे दूध काही शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांनी पिले. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सात ते आठ गावांमध्ये या कुत्र्याने उच्छाद मांडला होता. अद्यापही रेबिजची बाधा झालेली जनावरे पूर्णपणे बरी झाली नसल्याने शेतकरी भयभित झाले आहेत.

लसीकरण कालावधी पूर्ण झाला नव्हता
पिसाळलेल्या कुत्र्याने दंश केलेल्या गायींवर उपचार केले. लसीकरणाचा कालावधी 90 दिवसांचा असतो. हा कोर्स पूर्ण झाला नव्हता. लसीकरणाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक होते. लसीकरण पूर्ण न झाल्याने गायी पिसाळल्या.’’ डॉ. एल.बी. भांगरे, उपायुक्त पशुचिकित्सालय, अकोले.
पशुवैद्यकही जबाबदार
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या व्यक्तींवर उपचार झाले. परंतु जनावरांना पशुवैद्यकांनी रेबिजची बाधा झालेल्या जनावरांना रेबिजचे इंजेक्शन देऊनही ते अद्याप रोगमुक्त झाले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या गायी ठार कराव्या लागल्या. याला सर्वस्वी डॉक्टर जबाबदार आहे.’’ जालिंदर शेटे, शेतकरी ढोकरी.
पिसाळलेल्या कुत्र्याने यांना घेतला चावा
पिसाळलेल्या कुत्र्याने सुंदराबाई लोहटे (रुंभोडी), शंकरराव वाळुंज यांची गाय (औरंगपूर फाटा), सखाहारी आरोटे (अकोले), सीताराम धुमाळ, गौतम मोरे, किसन नवले (नवलेवाडी), तनुजा मंडलीक (माळीझाप), उल्हास गांगड (घाटघर) आदींसह अन्य दहा जणांना श्वानदंश झाला.