आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची भरतीच नियमबाह्य, स्थायी समिती सभेत सदस्यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सन२०१३ मध्ये झालेल्या खासगी संस्थांमधील ८२ प्राथमिक शिक्षकांची भरती नियमबाह्य असल्याचा आरोप स्थायीच्या सभेत करण्यात आला. या भरतीवरून गोंधळ निर्माण झाल्याने चौकशीनंतर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकाऱ्याने पदावर येताच दोन दिवसांतच ८२ शिक्षकांना खासगी संस्थेत नियुक्तीचे पत्र दिले. या विषयाकडे मागील स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी लक्ष वेधले होते. तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी घाईत निर्णय घेतल्याबद्दल सदस्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबतची माहिती पुढील सभेत सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विद्यमान जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी माहिती सादर केली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, मीरा चकोर, नंदा वारे, सदस्य विठ्ठल लंघे, सुजित झावरे, कैलास वाकचौरे, बाळासाहेब हराळ, राजेंद्र फाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल उपस्थित होते.
प्रशासनाकडून संबंधितांची पाठराखण केली जात असल्याचा अारोप सदस्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. हराळ यांनी अहवाल सादर करण्यास सांगितल्यानंतर कडूस यांनी भरती प्रक्रियेची माहिती वाचून दाखवली, त्याच्या प्रतीही सादर केल्या. या बैठकीला उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद सातत्याने गैरहजर राहात असल्याचे झावरे यांनी निदर्शनास आणून दिले. खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या भरतीचे नियम डावलून दोन दिवसांत घाईत ही भरती उरकल्याचा आरोपही त्यांनी केला. हा संपूर्ण प्रकार गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थायीच्या प्रसिद्धीपत्रकातही या गंभीर विषयाची माहिती लपवण्यात आली.
कुणावरही पांघरुण घालणार नाही...
ज्या वेळीही भरती प्रक्रिया राबवली गेली, त्यावेळी आम्ही पदावर नव्हतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल माहिती नाही. सदस्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, कुणावरही पांघरूण घातले जाणार नाही.'' अण्णासाहेब शेलार, उपाध्यक्ष, जि. प.
प्रक्रिया बेकायदेशीर
शिक्षणसेवक भरती प्रक्रिया बेकायदेशीर असून त्यात "अर्थ'पूर्ण तडजोडी झाल्या आहेत. अधिकारी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन करण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधितांवर वचक बसवण्यासाठी प्रशासनाने चुकीेचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.'' सुजित झावरे, सदस्य,िजल्हा परिषद.
शिक्षक भरतीची माहिती मागवली
८२शिक्षकांची भरती करताना कोणते नियम लावले, यासह संपूर्ण माहिती मी मागितली आहे. पुढील बैठकीत ही माहिती सादर करण्याच्याही सूचनाही दिल्या आहेत. आजच्या बैठकीत प्रशासनाने खुलासा दिला. सोमवारी माहिती घेतल्यानंतर चौकशीचे आदेश दिले जातील.'' मंजूषा गुंड, अध्यक्ष, जिल्हा परिषद.