आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rehabilitation Package For HIV Patients In Ahmednagar

एचआयव्हीग्रस्तांसाठी पुनर्वसन संकुल, उद्योग समुहाकडून मदत आज होणार लोकार्पण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- एचआयव्ही बाधितांसाठी स्नेहालयाच्या वतीने इसळक (ता. नगर) येथे उभारण्यात आलेल्या जीकेएन सर्वांगीण पुनर्वसन संकुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता होत आहे. या कार्यक्रमास जीकेएन उद्योग समूहाचे भारतातील प्रमुख व्यवस्थापकीय संचालक हेमंत निघोजकर, मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ. उज्ज्वल भट्टाचारजी, नगरच्या उद्योग समूहाचे प्रमुख राहुल काळे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक देवेंद्र अकोलकर व संग्राम कदम यांनी दिली.
दोन तपांपूर्वी देशात सर्वप्रथम एचआयव्ही बाधितांसाठीचा निवासी पुनर्वसन व उपचार प्रकल्प स्नेहालयाने नगर येथे सुरू केला. स्नेहालयाच्या प्रेरणेने मागील दहा वर्षांत अनेक ठिकाणी असे प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे १८ वर्षांच्या आतील मुला-मुलींना काळजी व संरक्षण पुरवले गेले. तथापि, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर कुटुंबाचा किंवा अन्य कुठलाही आर्थिक आधार नसलेल्या एचआयव्ही बाधित युवक व युवतींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशीच परिस्थिती कुटुंबातून नाकारलेल्या एचआयव्ही बाधितांची होते. देशात हा प्रश्न गंभीर होत असताना त्याचे उत्तर देणारे एक आदर्श प्रतिमान उभे करण्याचा प्रयत्न स्नेहालय परिवाराने केला. या कामासाठी जीकेएन सिंटर मेटल उद्योग समूहाने आर्थिक सह्योग व मार्गदर्शन दिले. येथील उद्योजक जयकुमार मुनोत, गुरुकृपा कन्ट्रक्शनचे शिरीष कुलकर्णी आदींनी या प्रकल्पाच्या उभारणीत सह्योग दिला. स्नेहालयाच्या हिम्मग्राम प्रकल्पात विविध उपक्रमांच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्तांना भक्कम आधार दिला जात आहे. तेथे शेती व फलोत्पादनाचा प्रकल्पही चालवला जातो.

3 एकरांवर प्रकल्प
इसळक येथील तीन एकर जागेत उभारण्यात आलेल्या जीकेएन पुनर्वसन संकुलात एचआयव्ही बाधित १८ वर्षांवरील युवक-युवतींसाठी स्वतंत्र वसतिगृह, रोजगार प्रकल्प, बहुउद्देशीय सभागृह असेल, अशी माहिती स्नेहालयाचे मुख्य समन्वयक अंबादास चौहान, हनिफ शेख व प्रवीण मुत्याल यांनी दिली.