आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेहेकुरी अभयारण्य होतेय मोकळे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथील काळवीट अभयारण्यात सध्या वन्यजीव विभागातर्फे अनावश्यक व काळविटांना अडथळे ठरणारी झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अभयारण्य मोकळे होऊन काळवीट तेथेच राहतील व परिसरातील श्तक-यांचा त्रास कमी होणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अजित चव्हाणके यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
काळविटांना अभय देण्यासाठी या अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. त्याचा आकार तसा कमी आहे. काळवीट किंवा कृष्णमृग हा कळपाने राहणारा प्राणी असून कळपात 10 ते 30 संख्या असते. गवताळ किंवा खुरटी झुडपांत त्यांचा अधिवास असतो. डोंगराळ, तसेच घनदाट जंगलात राहण्याचे ते टाळतात. माद्या नरापेक्षा लहान असतात. त्यांना शिंगे नसतात. नरांना 40 ते 50 सेंटीमीटर उंचीची पिळदार व डौलदार शिंगे असतात. काळवीट हा जगातील वेगाने धावणारा प्राणी असून तो ताशी 10 किलोमीटर वेगाने धावू शकतो. काळविटांचे अंदाजे आयुष्यमान 12 ते 15 वर्षांचे असते
या अभयारण्यात काळवीट, चिंकारा, लांडगा, कोल्हा, नाग, धामण, कापशी, माळटिटवी, जंगली कबुतर, शिंपी, गायबगळा व चित्रबलाक अशी प्राणी, पक्षी आढळतात. पंधरा वर्षांपूर्वी ज्याला वन्यजीवविषयक काहीही ज्ञान नाही, अशा अधिका-याच्या सूचनेवरून तेथे चक्क वृक्ष लागवड करण्यात आली. त्यामुळे ज्याच्यासाठी अभयारण्य ते काळवीटच तेथून निर्वासित झाले. त्यांचा मुक्काम अभयारण्याबाहेर राहायला लागला. त्यामुळे श्ोतक-यांचा त्रास वाढला. अभयारण्याबाहेरच्या काळविटांची मोठ्या प्रमाणात शिकार सुरू झाली. बाँम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या तज्ज्ञांनी व जाणकार वनअधिका-यांनी पाच वर्षांपूर्वीच झाडे तोडण्याची सूचना केली होती. अधिवास लोप पावत असल्याने काळवीट या क्षेत्रातून स्थलांतर करण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून वनविभागाने चालू वर्षी या क्षेत्रातील झाडाझुडूपांचे विरळीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून ते अंतिम टप्प्यात आहे.
काळविटांना पाण्याची सोय - यावर्षी रेहकुरी अभयारण्य परिसरात अत्यंत कमी प्रमाणात (188 मिमी) पाऊस झाल्याने सर्व पाणवठे, बंधारे कोरडे पडले असून दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. काळविटांसाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नियमित पाणवठ्याशेजारी कृत्रिम बोअरवेल घेतले असून त्यामध्ये हातपंप किंवा मोटारीद्वारे पाणी सोडले जात आहे. वनक्षेत्रात वणवा लागू नये यासाठी खबरदारीचा पर्याय म्हणून वनक्षेत्राभोवती 6 मीटर रुंदीचे जलरेषा पट्टे घेण्यात आले आहेत.