आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक कार्यक्रमांनी हिवरे कोरडा येथे मळगंगा मंदिराचे कलशारोहण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील श्री मळगंगा मंदिराचा कलशरोहण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्त पुणतांबे येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे महंत रामानंदगिरी महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह पुणे मुंबई येथे रहिवासी असलेले हिवरे कोरडाचे मूळचे ग्रामस्थही उपस्थित होते.

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. येथील मळगंगा देवीचे आधीचे मंदिर सन १९१६ मध्ये पूर्ण झाले होते. बरोबर शंभर वर्षांनी ग्रामस्थांनी सुमारे ४० लाखांचा खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आरषाच्या काचांच्या नक्षीमुळे हे मंदिर अतिशय देखणे झाले आहे. ते पाहण्यासाठी परिसरातील भाविक येता आहेत. गावातील पुरातन जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम ग्रामस्थांनी पाच वर्षांपूर्वी हाती घेतले होते. गावातील गट-तट, राजकारण, आपसांतील मतभेद विसरून सर्व एकत्र आले. त्यासाठी मंदिर जीर्णोद्धार समितीची स्थापना करून घरा घरामध्ये जाऊन लोक वर्गणी गोळा करत मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले. या मंदिराच्या कलशारोहणा निमित्त शनिवार पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात मंदिरावर कळस चढवण्यात आला. चमकदार कळस बसवल्यानंतर ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण झाले. त्याला नमस्कार करत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शनिवारी सकाळी समाज प्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे कीर्तन, सायंकाळी रंग स्वरांचे हा कार्यक्रम, रविवारी सकाळी रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन झाले. सायंकाळी कलशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोलापूरचे हलगी पथक सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. यावेळी शोभेच्या दारुची आकर्षक आतषबाजी करण्यात आली. सोमवारी मंहत रामानंदगिरी महाराज यांचे कीर्तन झाले. या कार्यक्रमाला हिवरे कोरडासह परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दुपारी १२ वाजता मंहत रामानंद गिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. त्याआधी गावातील जोडप्यांनी कलशाचा होमहवन विधी केला.

कलशारोहणासाठी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस गावात ग्रामस्थांतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील श्री मळगंगा मंदिराचा कलशारोहण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रथमच ड्रोनने छायाचित्रण
हिवरेकोरडा हे छोटेसे गाव आहे. पाणलोट विकासासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील सर्वांत मोठ्या कार्यक्रमाच्या छायाचित्रणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. हे प्रथमच घडल्याने त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये मोठे कुतुहल होते. छायाचित्रणासाठी खास पुण्याचे छायाचित्रकार येथे आले होते. मंदिरातील मूर्तीभोवती आकर्षक पानाफुलांची सजावट करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...