आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे पाहून मनसेचे पदाधिकारी समाधानी, रिलायन्सच्या निधीतून झालेल्या कामांचे प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- रिलायन्सच्या निधीतून झालेली पॅचिंग व रस्ता नुतनीकरणाची सहा कामे मनपा अभियंत्यांकडून मनसे पदाधिका-यांना शुक्रवारी दाखवण्यात आली. आठवडाभरापूर्वी या कामांची चौकशी करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. पाहणीनंतर कामे जागेवर असल्याचे पत्रक मनसे पदाधिकाऱ्यांनी दिले अाहे. पंधरा दिवसांत चौकशी अहवालाची प्रतही मिळणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी पत्रकात म्हटले आहे.

रस्ते खोदाईच्या भरपाईपोटी रिलायन्सने जवळपास पाच कोटी रुपये मनपाकडे जमा केले आहेत. या निधीतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करून मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिला होता. आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार मनसे जिल्हाध्यक्ष डफळ, शहराध्यक्ष गिरीश जाधव, शहर सचिव नितीन भुतारे, उपशहराध्यक्ष अशोक दातरंगे यांच्यासह अभियंता एम. एस. पारखे व श्रीकांत निंबाळकर यांनी संयुक्तपणे सहा कामांची पाहणी केली. प्रोफेसर कॉलनी चौक कुष्ठधाम चौक, समतानगर,पाइपलाइन रस्ता या परिसरात झालेली ही कामे आहेत. मोजमाप पुस्तिका, कामांची धावती देयके, काम करतानाचे फोटो व इतर कागदपत्र अभियंत्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दाखवली. मोजमाप पुस्तिकेप्रमाणे ही कामे जागेवर असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे मान्य केले आहे.

दोषींवर कारवाई
पॅचिंगचे काही ठिकाणचे काम उखडले अाहे. ते काम करण्याबाबत ठेकेदारास लेखी कळवले. मनपाचे अभियंते या कामांची चौकशी करून पंधरा दिवसात उपायुक्तांकडे अहवाल सादर करणार आहेत. या अहवालाची प्रत मनसे पदाधिकाऱ्यांनाही देण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे सांगितले.