आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Inquiry Hand Over To Deputy Commissioner

रिलायन्स प्रकरणाची चौकशी उपायुक्तांकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रिलायन्स प्रकरणातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने महापालिकेतील अनेक संबंधित अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. नगरसेवकांसह कामांची पाहणी केल्यानंतर आयुक्त विजय कुलकर्णी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उपायुक्त भालचंद्र बेहेरे या प्रकरणाची चौकशी करून महासभेसमोर अहवाल सादर करणार आहेत. दरम्यान, आयुक्त कुलकर्णी सोमवारपासून (९ फेब्रुवारी) दीर्घ रजेवर जात आहेत. त्यामुळे याप्रकरणी महासभेत होणा-या आरोप- प्रत्यारोपांना इतरांनाच तोंड द्यावे लागणार आहे.

रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीमार्फत शहरातील ३९ मार्गांवर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यात अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले, त्याची नुकसान भरपाई म्हणून रिलायन्सने महापालिकेला पाच कोटी ११ लाख रुपये दिले. प्रशासनाने या पैशातून विविध रस्त्यांची कामे हाती घेतली. परंतु त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. आयुक्त कुलकर्णी यांनी तीन दिवसांपूर्वी मनसे नगरसेवकांसह या कामांची पाहणी केली. अनेक कामे झाली नसल्याचे मान्य करत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशीची जबाबदारी उपायुक्त बेहेरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंधरा दिवसांत कामाची चौकशी करून सविस्तर अहवाल महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील संबंधित अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी मनसेसह शिवसेना नगरसेवक महासभेत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. परंतु आयुक्त कुलकर्णी २८ फेब्रुवारीपर्यंत दीर्घ रजेवर जात आहेत. त्यामुळे महासभेत आक्रमक होणा-या नगरसेवकांचा रोष इतर अधिका-यांनाच सहन करावा लागणार आहे.

एखाद्या विकासकामातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणून नंतर गप्प बसायचे, असा काही नगरसेवकांचा आतापर्यंतचा इतिहास आहे. रिलायन्स प्रकरणात मनसेसह शिवसेना नगरसेवकही आक्रमक झाले, त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. चौकशी अहवाल महासभेसमोर आल्यानंतर या नगरसेवकांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवणे आवश्यक आहे.

निविदा काढून पुन्हा कामे करावीत
रिलायन्सच्या पैशातून होणा-या उर्वरित २० कामांसाठी निविदा काढू, असे प्रतिज्ञापत्र शहर अभियंता नंदकुमार मगर यांनी उच्च न्यायालयात सादर केले. परंतु न झालेल्या कामांसाठी निविदा काढाव्या, झालेल्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, असे पत्र शाकीर शेख यांनी आयुक्तांना दिले.

अहवाल वेळेत सादर करण्याचा प्रयत्न
रिलायन्सच्या पैशातून झालेल्या कामांची पाहणी करून चौकशी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. दैनंदिन काम सांभाळून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल महासभेसमोर वेळेत सादर करण्याचा प्रयत्न राहील.''
भालचंद्र बेहेरे, उपायुक्त, कर.