आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Religion, Going Beyond The Kept 'and' Humanity Clean Well!

धर्मापल्याड जाऊन जपला ‘त्यांनी’ माणुसकीचा निर्मळ झरा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-लहानपणी आईच्या मायेला पारखं झालेल्या मुलाला ‘तिने’ पोटच्या गोळ्यासारखा जीव लावला. त्या मुलाने अन् कुटुंबानेही तिच्या ऋणांची परतफेड केली. शेजारधर्म म्हणा अथवा मातृप्रेमाचे ऋण. पण, ‘माणुसकी हेच सर्वात मोठे नाते व सर्वांत मोठा धर्म’ हे त्या मुलाने व त्याच्या कुटुंबाने दाखवून दिले. वृत्तछायाचित्रकार राजू शेख हा तो मुलगा व सुलोचना अशोक जगदाळे ही ती माता. गेल्या आठवड्यात ‘ती’ वृद्धा देवाघरी गेली. तिच्यामागे कोणीच नसल्याने शेख यांनीच तिची यथासांग उत्तरक्रिया केली.
1963-64 चा काळ. राजू शेख यांचे वडील बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाशेजारी नांगरेगल्लीत रहायचे. लहानपणीच राजू यांचे मातृछत्र हरपले. यानंतर शेजारच्या सुलोचना जगदाळे यांनीच त्यांचा सांभाळ केला. तब्बल 40 वर्षे शेजारी राहिल्यानंतर शेख कुटुंबीय काटवन खंडोबा रोडवरील गाझीनगर परिसरात स्थलांतरित झाले. पण, तरी जुना घरोबा कायम होता. सुलोचना यांना आई मानलेले शेख कुटुंबीयच त्यांच्या घरी दिवाबत्ती करायला जात. कारण, सुलोचना जगदाळे याही तशा निराधारच होत्या.
राजू शेख यांची मुले वाजिद, साजिद व शाहरूख हे दररोज आजीकरिता डबा नेत. राजू यांच्या पत्नी सकिना व मोठी सून हिना हा दोन वेळचे जेवण बनवते. आजीच्या आवडीनिवडी त्यांनी जोपासल्या. आजीचा उपवास असेल, तर जेवणाच्या डब्यात साबुदाण्याची खिचडी, फराळाचे पदार्थ असायचे. वाजिदच्या लग्नात जगदाळे आजींना खास मान होता. आता साजिदचेही लग्न करा, असा लकडा त्यांनी शेख कुटुंबीयांकडे लावला होता.
आजारी असलेल्या या सुलोचना आजींचे 22 जानेवारीला निधन झाले. आजींमागे दुसरे कोणीच नसल्याने त्यांचा अंत्यविधी आणि उत्तरक्रिया शेख कुटुंबीयानीच केली. संकेत होशिंग, संजय सुपेकर, प्रकाश घोलप, सुधाकर बोज्जा, मुकेश कोरडे, उमेश कोरडे या इतर शेजार्‍यांच्या मदतीने अंत्यविधी झाला. तिसर्‍या दिवशी राजू शेख यांनी हिंदू धर्माप्रमाणे पिंडदानही केले. वसंत झावरे यांच्यासोबत प्रवरासंगमला जाऊन मानलेल्या आईचे पिंडदान व अस्थिविसर्जनही राजू शेख यांनी केले. पिंडदान विधीसाठी लागणारा वरणभात, पापडाचा नैवेद्य राजू यांच्या पत्नी सकिना व सून हिना यांनी तयार करून दिला.
‘मानलेली असली, तरी ती माझी आईच होती’ हे सांगताना राजू शेख यांचे डोळे पाणावतात. ‘गेल्या वर्षी गल्लीत चोरी झाली होती, तेव्हा तिच्या डोळ्यांत आमची काळजी दाटली होती. माझा सांभाळ करताना धर्म कधीही तिच्या आड आला नाही, मग तिच्या उत्तरक्रियेला तरी तो कसा आड येईल, असा त्यांचा सवाल आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा शेख कुटुंबाने निर्माण करून जोपासली. धर्माच्या पल्याड जाऊन माणुसकीचे नाते जोपासत शेख कुटुंबाने एक वेगळा आदर्श उभा केला आहे.
‘पुत्र’ व्हावा ‘राजू’ जैसा
आजवर मी अनेक अंत्यविधी पाहिले. हल्लीची मुले आई-वडिलांचा अंत्यविधी करायला नाकं मुरडतात. आई-वडिलांविषयी त्यांना वाटणारे प्रेम कमी होताना दिसते. काही नोटा दाखवून आम्हालाच विधी उरकायला सांगतात. राजू शेख यांनी मात्र जाती-धर्माच्या पल्याड जाऊन मानलेल्या आईची विधिवत उत्तरक्रिया केली. शेख यांनी मांडलेल्या पिंडाला काकस्पर्शही चटकन झाला. खरंच पुत्र असावा, तर राजू शेख यांच्यासारखा! मुकेश पाठक, पुरोहित, अमरधाम.
सकिना व राजू शेख दाम्पत्य
शेजारधर्म म्हणा अथवा मातृप्रेमाचे ऋण. पण, ‘माणुसकी’ हेच सर्वांत मोठे नाते असते, हे राजू शेख व त्यांच्या कुटुंबाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मानलेल्या आईची सेवा करताना जाती-धर्म कधीच आड आला नाही. ‘हिंदू-मुस्लिम ऐक्या’चे हे एक आदर्श उदाहरण ठरावे.
धर्मापल्याड जाऊन जपला ‘त्यांनी’ माणुसकीचा निर्मळ झरा !