आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावणार, पालकमंत्री राम शिंदे यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बचत गटांना अर्थसाहाय्य देऊन अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. "साईज्योती'सारख्या प्रदर्शनातून ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचवण्याचे कार्य जिल्हा परिषद, तसेच ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून केले जात आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री राम शिंदे यांनी काढले.
साईज्योती स्वयंसाहाय्यता यात्रा २०१५ जिल्हास्तरीय बचतगट प्रदर्शनाचे उद््घाटन पालकमंत्री शिंदे यांच्या शनिवारी हस्ते झाले. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती मीरा चकोर, बाबासाहेब दिघे, नंदा वारे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेत त्रिस्तरीय यंत्रणा काम करते. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ६७ हजार कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवूनदेखील दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांची संख्या वाढते आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. बचत गटांना अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करून आर्थिक स्तर उंचावण्याचे काम सुरू आहेत.
महिलांसाठी आता सर्वच क्षेत्रांत आरक्षण आहे. तथापि, विधानसभेत महिलांसाठी आरक्षण नसतानाही मोनिका राजळे व स्नेहलता कोल्हे या विधानसभेवर निवडून आल्या, असे सांगत त्यांच्या कामाचे मंत्री शिंदे यांनी कौतुक केले. जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी (१९ जानेवारी) होणार असून त्यात कुणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन मंत्री शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. प्रदर्शनाच्या माध्यमातून चार दिवस गटांचे काम कशा पद्धतीने सुरू आहे याची चर्चा होते. त्यातूनच एकमेकांना प्रोत्साहन मिळते, असे ते म्हणाले.
गुंड म्हणाल्या, या प्रदर्शनासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटपर्यंत बचतगट चालकांचे स्टॉलसाठी फोन येत होते. पुढील वर्षी जास्तीत जास्त बचत गटांचे स्टॉल लावण्याचे नियोजन आखले जाईल. दरवर्षी या प्रदर्शनातून मोठी उलाढाल होते, यावर्षी देखील विक्रमी उलाढाल होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी पालघरच्या आदिवासींनी तारपा नृत्य सादर केले. कमरेला पाला व डोक्यावर काटक्यांचा टोप परिधान केलेल्या कलावंतांनी ही कला सादर केली.

दोन तास उशीर
साईज्योती स्वयंसाहाय्यता यात्रा बचतगटांच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद््घाटन पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी तीन वाजता होणार होते. तथापि, मंत्र्यांना येण्यास तब्बल दोन तास उशीर झाल्याने उद्घाटन पाच वाजता झाले. उशीर काही अपरिहार्य अडचणींमुळे झाल्याचा खुलासा करून शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
काहीतरी चुकतंय...
शासनामार्फत केंद्रिभूत योजना राबवल्या जात असताना काहीतरी चुकतंय. लाभार्थी निवडीचे अधिकारी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला दिले गेले. त्या लाभांमुळे काहीतरी फरक दिसायला हवा होता. दारिद्र्यरेषेच्या यादीत अनेकवेळा चार चाकीवाल्यालाही निवडले जाते. अशा पद्धतीने चालले, तर गरीब हे गरीबच राहतील. त्यामुळे योग्य लाभार्थीच निवडावेत. यापुढील काळात याबाबत दक्षता घेण्यात यावी.'' अनिल कवडे, जिल्हाधिकारी.

६४० गट पुनर्जीवित केले
ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आतापर्यंत सुमारे साडेसात हजार गटांना खेळते भांडवल उपलब्ध झाले आहे, तसेच पाच हजार गटांना अनुदान दिले आहे. जे गट यापूर्वी सुरू होऊन बंद पडले अशा ६४० गट पुनर्जीवित करण्यात आले आहेत. महिलांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्ह्यात नव्याने सुमारे सव्वातीनशे गटांची स्थापना करण्यात आली आहे.'' शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी